गणेशोत्सव कालावधीत वीज जोडणी तोडल्यास खबरदार!, शिवसेना शिंदे गटाने दिला इशारा
By सुधीर राणे | Published: August 26, 2022 04:17 PM2022-08-26T16:17:09+5:302022-08-26T16:17:46+5:30
गणेशोत्सव काळात वीजग्राहकांना वीजबिलवसुलीचा तगादा लावू नये
कणकवली : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर विजवितरणचे कर्मचारी ग्राहकांच्या दारात विज बिल वसुलीला जात आहेत. तसेच वीज जोडणी तोडत आहेत. जर यापुढे गणेशोत्सवाच्या काळात कोणाचीही वीज तोडली तर गप्प बसणार नाही. आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजवितरण कार्यालयावर शुक्रवारी धडक देत अधिकाऱ्यांना इशारा दिला.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती संदेश सावंत-पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजवितरणच्या कणकवली येथील विभागीय कार्यालयावर धडक दिली. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत यांच्याशी चर्चा करताना तालुक्यातील ग्रामीण भागातील विजग्राहकाना विजवितरण अधिकारी, कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल जाब विचारण्यात आला.
संदेश सावंत- पटेल, यांनी १५ सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सव काळात वीजग्राहकांना वीजबिलवसुलीचा तगादा लावू नये. थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज जोडणी या काळात खंडित करू नये. श्री गणेशाचे आगमन अंधारात कोणाच्याही घरी होता नये. याची खबरदारी घ्या अशी सक्त सूचना केली. तर जबरदस्तीने कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित कराल तर आम्ही कायदा हातात घेऊ. असा इशाराच माजी नगरसेवक भूषण परुळेकर यांनी दिला.
ग्रामीण भागात विजवितरणचे अधीकारी, कर्मचारी वीज देयक वसुली आणि विज जोडणी तोडण्याची कारवाई करण्यासाठी घरोघरी फिरत आहेत. मात्र कणकवली शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याकडे सुनील पारकर यांनी लक्ष वेधले. चर्चेअंती अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगत यांनी या काळात कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडणार नाही असे आश्वासन दिले.
दरम्यान, विजवितरणकडून गणेशोत्सव काळात विज जोडणी तोडली तर शिंदे गटाचे संदेश पटेल, भूषण परुळेकर, शेखर राणे, सुनील पारकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरीकाना करण्यात आले आहे. यावेळी भास्कर राणे, शेखर राणे, राजन म्हाडगुत, दामोदर सावंत, मारुती सावंत, दीपक राऊत आदी उपस्थित होते