विकासासाठी एकसंध व्हावे
By admin | Published: May 27, 2016 10:10 PM2016-05-27T22:10:05+5:302016-05-27T22:19:32+5:30
नारायण राणे : कुडाळ नदीपात्राची पाहणी; पाणी पुरवठा सुरुळीत होणार
कुडाळ : कुडाळ भंगसाळ नदी पात्रात गाळ उपसा उपक्रम येथील सामाजिक संघटनांनी सर्वांच्या सहकार्याने एकत्र येत चांगल्या प्रकारे राबविला आहे. अशाच प्रकारे विकासाला चालना देण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी भंगसाळ नदीतील गाळ काढण्याऱ्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करताना केले. यावेळी राणे यांनी भंगसाळ नदीपात्रात गाळ उपसा उपक्रमाची पाहणी केली.
कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ गेली अनेक वर्षे न काढल्यामुळे येथील नदीच्या पात्रात गाळाचे छोटे मोठे डोंगर तयार झाले आहेत. यामुळे येथील नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात प्रत्येकवर्षी घटत आहे. येथील नदी पात्रातील गाळ काढून नदीतील पाण्याची पातळी वाढेल. कुडाळ शहराबरोबरच अन्य आजूबाजूच्या गावांना मुबलक पाणी पुरवठा होईल. नदीही स्वच्छ होईल. या उद्देश्याने कुडाळ येथील सामाजिक संघटना एकत्र येत येथील नदी पात्रातील गाळ महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून काढण्यासाठी पुढाकार घेतला असुन गेल्या अनेक दिवसापासून हा गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून सदरचा हा गाळ उपसा उपक्रम एमआयडीसी जॅकवेलच्या ठिकाणच्या भंगसाळ नदी पात्रात सुरू आहे. या ठिकाणी नारायण राणे यांनी गुरूवारी सांयकाळी भेट देत पाहणी केली. तसेच हा उपक्रम राबविणाऱ्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकारणारे माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांचा तसेच या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या पत्रकार समितीतर्फे समितीचे सचिव विलास कुडाळकर यांचाही विशेष सत्कार राणे यांनी केला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सतीश सावंत, रणजित देसाई, विकास कुडाळकर, अमित सामंत, नगराध्यक्ष विनायक राणे, उप नगराध्यक्ष आबा धडाम, रूपेश पावसकर, सुनील बांदेकर, गजानन कांदळगावकर, , डॉ. संजय केसरे, डॉ. संजय सावंत, दिनेश साळगांवकर, राजन बोभाटे, कमलेश पाटकर, प्रणय तेली, अमोल सामंत, अनिल कुडपकर, नितीन कुडाळकर तसेच इतर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.