बीच शॅकमुळे रोजगाराचे नवे दालन खुले होणार : हरी खोबरेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:43 PM2020-07-01T12:43:29+5:302020-07-01T12:45:55+5:30
कोकण किनारपट्टीवर गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक धोरणास मंजुरी देताना ८ ठिकाणी पायलट प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मालवण किनारपट्टीवरील तारकर्लीचा समावेश आहे.
मालवण : सागरी पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या तारकर्लीसह कोकण किनारपट्टीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
कोकण किनारपट्टीवर गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक धोरणास मंजुरी देताना ८ ठिकाणी पायलट प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मालवण किनारपट्टीवरील तारकर्लीचा समावेश आहे. ही बाब आमच्यासाठी आनंदाची व अभिमानाची असून पर्यटन वाढीबरोबर रोजगाराचे नवे दालन खुली करणारी आहे, असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख तथा तारकर्ली जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने येथील पर्यटन विकासासाठी ज्या मागण्या आम्ही आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पोहोचविल्या त्यात बीच शॅक ही मागणीही प्रामुख्याने होती. या मागणीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त करीत असल्याचे खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झुकते माप नेहमीच राहिले आहे. कोकणवर असलेले विशेष प्रेम पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही आपल्या कामातून दाखवून देत आहेत. मच्छिमारांसह शेतकरीवर्गाला फायदेशीर ठरणारी चांदा ते बांदा योजना माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून यापूर्वी राबविण्यात आली. यापुढे नव्या योजनेतून शेतकरी, मच्छिमार यांच्यासह पर्यटन व्यावसायिक व अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असेही खोबरेकर म्हणाले.
स्थानिकांना रोजगाराचे नवे दालन
बीचवर शॅक धोरणास मंजुरी मिळावी यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार आपण पर्यटन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असल्याचे खोबरेकर यांनी स्पष्ट केले. बीच शॅक धोरणास मान्यता मिळाल्यामुळे भविष्यात देशी-विदेशी पर्यटकांना समुद्रकिनारी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या धोरणांतर्गत राज्यातील ८ समुद्र किनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहेत.