बसस्थानकांचे सुशोभिकरण
By admin | Published: December 29, 2015 10:12 PM2015-12-29T22:12:43+5:302015-12-30T00:48:24+5:30
दिवाकर रावते : कोकणातील जनतेचे एस. टी.वरच प्रेम
देवगड : कोकणातील जनतेचे एस. टी.वर प्रेम असल्याने कोकणी माणूस एस. टी.नेच प्रवास करतो. यामुळे कोकणातील एस. टी. स्थानकांचे येत्या काही महिन्यांमध्ये सुशोभिकरण करून विकासाच्या दृष्टीकोनातून गतिमान कोकण बनवण्याचा शिवसेनेचा ध्यास असल्याचे बुरंबावडे येथे कै. मालती देवजी दुधवडकर प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. बुरंबावडे येथे कै. मालती देवजी दुधवडकर प्रवेशद्वाराचे उद्घाटन मंगळवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आंबेस्कर, कोल्हापूर व सिंंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, शिवसेना प्रवक्ते अरविंंद भोसले, कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, सांगली जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, संग्राम कुपेकर, आनंदा पवार, शिवाजी जाधव, राजू नाईक, मंगला चव्हाण, तहसीलदार जीवन देसाई, युवा जिल्हा प्रमुख हर्षद गावडे, अभय शिरसाट, विलास साळसकर, संजय पडते आदी मान्यवर उपस्थित होते.बुरंबावडे येथे अरूण दुधवडकर यांनी बुरंबावडे तिठ्यावर आपल्या आईच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधलेल्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत असताना रावते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अनेक एस. टी. स्थानकांचे सुशोभिकरण येत्या काही महिन्यांमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये एस. टी.चे स्वरूपच बदलणार आहे. कोकणात एस. टी.ला मिळणारे उत्पन्न चांगले आहे. त्यामुळे याठिकाणी बसस्थानकांचे रुप पालटण्याचा महामंडळाचा विचार असल्याचे ते म्हणाले.गणेश चतुर्थीमध्ये कोकणातील येणाऱ्या चाकरमान्यांची सुलभ एस. टी.ची सोय नियोजनबद्ध केल्याने एकही अपघात न घडता चाकरमान्यांना चांगला प्रवास करायला मिळाला. कराड, चिपळूण रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून, यामुळे कोकणातील येणारी रेल्वे ही कोकण रेल्वेच असणार आहे. यामध्ये कोकणचेच प्रवासी प्रवास करणार आहेत. कोकणातून जाणाऱ्या अन्य रेल्वेही चिपळूण कराडमार्गे कर्नाटकात जाणार आहेत. यामुळे कोकण रेल्वे ही आता कोकणी प्रवासी असणारीच असणार आहे, असे रावते यावेळी म्हणाले.तसेच एस. टी.चे प्रत्येक ठिकाणी नियोजन करून सुलभ व सुरक्षित एस. टी. प्रवास असण्याचे समीकरणच तयार करणार असल्याचे रावते यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
विकास रखडला : सत्तेच्या विरोधात मतदारसंघ
देवगडला विकासात अग्रेसर बनविणार : दीपक केसरकर
पालकमंत्री दीपक केसरकर बोलताना म्हणाले की, देवगड मतदारसंघ हा सत्तेच्या विरोधात असलेला मतदारसंघ आहे. यामुळे या तालुक्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. मात्र, पालकमंत्री या नात्याने मी देवगडचा विकास करून विकास कामामध्ये देवगडला अग्रेसर बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन विकासासाठी सिंंधुदुर्गला १०० कोटीचा निधी मंजूर झाला असून, यामधील सर्वात जास्त निधी हा देवगड तालुक्यासाठी वापरला जाणार आहे. लवकरच विजयदुर्ग व देवगड किल्ल्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यामुळे याठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.