बाबासाहेबांमुळेच एकात्मता अबाधित
By admin | Published: November 27, 2015 08:48 PM2015-11-27T20:48:58+5:302015-11-28T00:11:21+5:30
स्नेहलता चोरगे : वैभववाडीत संविधान दिन साजरा
वैभववाडी : डॉ. बाबासाहेबांनी संविधानद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क, अधिकार मिळवून दिले असून, ते आजही अबाधित आहेत. त्यांनी समतेची शिकवण देऊन राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्याचे महान कार्य केले आहे. त्यामुळेच शंभर टक्के लोकशाही प्रणालीचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांनी येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.बौद्ध सेवा संघ आणि तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या आवारात ‘संविधान दिन’ साजरा केला. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार जी. आर. गावित, सभापती वैशाली रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, पंचायत समिती सदस्या शुभांगी पवार, माजी बांधकाम सभापती जयेंद्र्र रावराणे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, नगरसेवक रोहन रावराणे, संतोष माईणकर, अक्षता जैतापकर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष यशवंत यादव, ग्रामीण शाखा अध्यक्ष शुभांगी यादव, प्रा. रमाकांत यादव, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, संजय कदम आदी उपस्थित होते.चोरगे म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांनी दलितांसह शोषितांना सुखकर जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. माणसाला आपल्या हक्क व अधिकाराची जाणीव करून देणारे संविधान आंबेडकर यांनी देशाला दिले. धर्म निरपेक्षता, समानता व राष्ट्रीय एकता याची शिकवण देणारे हे संविधान जगभर प्रसिद्ध झाले. त्यामुळे बाबासाहेबांची समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण प्रत्येक भारतीयाने आचरणात आणणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावंतवाडी येथील सगुण जाधव यांनी गाडगे महाराजांच्या वेशभूषेत त्यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेमुळे लोकशाही आणि देशातील सहिष्णुता आजही टिकून आहे. त्याचप्रमाणे देशवासीयांना अनेक घटनात्मक अधिकार प्राप्त झाले आहेत.
जयेंद्र रावराणे
देशाला एका चौकटीत बांधून ठेवण्याचे सामर्थ्य आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून केले. आजच्या महासत्तेचा पाया हा आंबेडकर यांनी रचला होता.
-भालचंद्र साठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष