उगाडेत शॉर्टसर्किटने घर बेचिराख
By admin | Published: April 6, 2016 11:03 PM2016-04-06T23:03:13+5:302016-04-06T23:38:44+5:30
दोन लाखांची हानी : राणे कुटुंबीयांवर काळाचा घाला
कसई दोडामार्ग : उगाडे येथील सीताराम संबाजी राणे यांच्या घरावर शॉर्टसर्किट होऊन पूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने घरातील सर्वजण शेतात गेल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. तलाठी व्ही. आर. ठाकूर यांनी पंचनामा केला. उगाडे येथे सीताराम राणे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असल्याने कामानिमित्त घरातील पाचही लोक सकाळीच घराबाहेर पडले होते. यामध्ये सीताराम राणे कामानिमित्त शेतामध्ये गेले होते, तर आई नातवाला घेऊन कळणे येथे गेली होती. अन्य दोन व्यक्तीही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या घराजवळून उच्च दाबाच्या विद्युतवाहक तारा गेल्या आहेत. बुधवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान या विद्युतवाहक तारांमधून अचानक स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला. क्षणार्धात राणे यांचे अख्खे घर जळून गेले. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच पांडुरंग राणे, चंद्रकांत पवार, संजय गाड, बाळा मांजरेकर, सूर्याजी राणे, आदी ग्रामस्थांसह महिलांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण ते निष्फळ ठरले. सीताराम राणे यांना आगीची माहिती मिळताच ते तत्काळ घरी परतले. परंतु, आगीपुढे सर्वच प्रयत्न अयशस्वी ठरले आणि घर पूर्णपणे जळाले. या आगीत घरातील सर्व गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामध्ये दोन खंडी नाचणी, दोन पोती तांदूळ, रोख ५० हजार, मंगळसूत्र, कपडे, भांडी, मिक्सर, गॅस शेगडी, आदींसह इतर सर्व वस्तू जळून क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे राणे कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.घटनास्थळी महसूल विभागाचे तलाठी व्ही. आर. ठाकूर, ग्रामसेवक नामदेव परब, कोतवाल जयवंत गवस यांनी येऊन पंचनामा केला. या आगीत सुमारे एक लाख ८८ हजार ८४० रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी ठाकूर यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात नुकसानीची रक्कम तीन ते चार लाख रुपये असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)