गवळदेवाच्या उत्सवाला सुरुवात
By admin | Published: December 4, 2015 11:39 PM2015-12-04T23:39:43+5:302015-12-05T00:19:59+5:30
परंपरेसह सामाजिक संघटनाही मजबूत : बा.. देवा.. गवळदेवा वाघ, रोगराईपासून गुरांचे रक्षण कर...
सुरेश बागवे -- कडावल
‘बा.. देवा.. गवळदेव वाघापासून आणि रोगराईपासून आमच्या गुरांचे रक्षण कर...’ अशी आर्त विनवणी
गो-पालकांकडून गवळदेवाला केली जात आहे. प्रतिकात्मक वाघाला गावाच्या सीमेबाहेर पिटाळले जाण्याचा या गवळदेवाच्या उत्सवाला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे.
या गवळदेवाच्या उत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या प्रसादामधून, घालण्यात येणाऱ्या भोजनावळीतून ग्रामस्थांना वनभोजनाचाही आनंद मिळत आहे. पण, हा प्रासादिक व प्राथमिक आनंद असला तरीही या निमित्ताने मात्र विज्ञान-तंत्रज्ञानाच्या
२१ व्या युगातही यामुळे सामाजिक संघटनांच्या मजबुतीचे जिवंत उदाहरणही अनुभवण्यास येत आहे. शिवाय यामुळे परंपरा जोपासली जात असून, गावागावांतील एकात्मतेचे दर्शनही पाहावयास मिळत आहे.
पूर्वी ग्रामीण भागात गो-धन हेच सर्वश्रेष्ठ धन मानले जायचे. त्यामुळे साहजिकच प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात मोठ्या संख्येने गुरेढोरे असत. गोठ्यातील वाढत्या गो-धनामुळे प्रत्येक शेतक ऱ्याच्या घरात दूधदुभते असल्याने घरातील लहानथोर, आबालवृद्धांचे प्रकृती स्वास्थ्यही चांगले राहत असे. तेव्हा शेतामध्ये रासायनिक खतांचा भडिमार नव्हता. शेण खताचाच वापर व्हायचा. त्यामुळे मिळणारे धान्याचे उत्पादनही गुणवत्तापूर्ण असायचे.
एकंदरीत गोधनामुळे तेव्हा घराघरांत सुबत्ता नांदत होती. या सुबत्तेचा गो-धन हा शिरोमणी असल्यामुळे तेव्हा या धनालाच सर्वश्रेष्ठ धन मानून त्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न होत असत.
विपुल गो-धनामुळे पूर्वी सुबत्ता, आरोग्य संपन्नता नांदत असली, तरी तत्कालीन परिस्थितीत असलेल्या मोठमोठ्या जंगलांमुळे शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा उपद्रवही अधिक होता. विशेषत: वाघासारखे हिंस्त्र प्राणी गुरावासरांवर हल्ला करून त्यांना ठार मारत असत. आताच्या तुलनेत तेव्हा वाघांची संख्याही कित्येक पटीने अधिक होती. वाघामुळे गो-धनाची अपरिमित हानी होत असे.
शिवाय पूर्वी आताप्रमाणे गावोगावी जनावरांचे दवाखाने नव्हते. त्यामुळे विविध रोगांनीही अनेक जनावरे बळी पडत असत. वाघ आणि विविध रोगांपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी सामूहिक पद्धतीने देवाला घातलेले साकडे, पुढे गवळदेव म्हणून ही प्रथा रूढ झाली.
गवळदेवामध्ये प्रतिकात्मक
वाघ पळविण्याचा प्रकार सर्वांत महत्त्वाचा मानला जातो.
तसेच गवळदेवाला सामूहिकपणे गाऱ्हाणे घालून गुराढोरांचे रक्षण करण्याची मागणी केली जाते. नंतर गवळदेवाच्या स्थळांवर सर्व स्नेहभोजन करतात.
गवळदेवाला विनवणी : वनभोजनाचा आनंद
विविध रूपात प्रतिकात्मक वाघ तयार करून त्याला गावाच्या सीमेबाहेर पिटाळले जात आहे. गवळदेवाचा प्रसाद म्हणून उठणाऱ्या जेवणावळींच्या पंगतींमध्ये ग्रामस्थांना वनभोजनाचाही आनंद मिळत आहे, त्याचबरोबर गावागावांतील शेतकऱ्यांच्यात स्नेह वाढत आहे.
ग्रामीण भागात आता गवळदेवाचे उत्सव सुरू झाले आहेत. ‘बा.. देवा.. गवळदेव वाघापासून आणि रोगराईपासून आमच्या गुरांचे रक्षण कर’ अशी विनवणी गो-पालक गावागावांतील शेतकऱ्यांकडून गवळदेवाला केली जात आहे.
गवळदेवाच्या निमित्ताने जनावरांच्या रक्षणाची हाक देण्यात येत असली, तरी विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगातही या प्रथेने समाजातील माणुसकी टिकू न राहत आहे.