माशांच्या उतरणीच्या हंगामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2015 10:01 PM2015-10-16T22:01:28+5:302015-10-16T22:13:45+5:30

खवय्यांची उडाली धांदल : ‘डोम’, ‘ओत’ यांचा होतोय वापर

The beginning of the harvest of fish ranch | माशांच्या उतरणीच्या हंगामाला सुरूवात

माशांच्या उतरणीच्या हंगामाला सुरूवात

Next

सुरेश बागवे -- कडावल--माशांचा उतरणीचा हंगाम सुरू झाला आहे. डोम्यात विविध प्रकारचे गोडे मासे पकडण्यासाठी खवय्यांची लगबग उडत आहेत. पाऊसही पडत असल्याने काही प्रमाणात मासे मिळत आहेत. शेवटच्या पावसापर्यंत आवश्यक तेवढे मासे मिळतील, असा अंदाज जाणकारांतून व्यक्त करण्यात येत आहे.साधारणत: अनंत चतुर्थीनंतर नदी-ओहोळ तसेच भातखाचरांमधील माशांचा वरील दिशेकडून खालच्या दिशेकडे असा उलटा प्रवास सुरू होतो. या क्रियेलाच माशांची उतरणी असे स्थानिक भाषेत म्हटले जाते. पावसाळा संपत आल्याची माशांना जाणीव होऊ लागल्यानंतर ते आपल्या सुरक्षेसाठी जास्त पाण्याच्या क्षेत्राकडे सरकत असल्याचे याबाबत जाणकारांचे मत आहे. उतरणीच्या काळात डोमे किंवा इतर पारंपरिक साधनांच्या सहाय्याने मासेमारी केली जाते. पाऊस पडल्यानंतर पाणी गढूळ होऊ लागले की, त्या ओताच्या खालच्या दिशेने डोमे किंवा ‘खून’ यासारखी पारंपरिक साधने लावली जातात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर खालच्या दिशेकडे सरकणारे मासे ओतावर आवरलेल्या डोम्यात पडून तेथेच अडकून राहतात. एकदा डोम्यात पडलेला मासा पुन्हा बाहेर पडू नये, अशीच या पारंपरिक साधनांची रचना असते. माशाचा किंवा खेकड्याचा रस्सा आणि तांदळाची भाकरी हा कोकणी माणसाचा ‘विक पॉर्इंट’. त्यातच गोड्या पाण्यातील माशांची चवच न्यारी. विशेषत: उतरणीच्या काळातील लहान मासे चवीसाठी अधिक प्रसिद्ध आहेत. हे मासे नदी-वहाळ तसेच भातखाचरांमध्ये अधिक प्रमाणात आढळत असतात. सध्या माशांचा उतरणीचा काळ सुरू आहे. पाऊसही पडत आहे. त्यामुळे मासे पकडण्यासाठी खवय्यांची धांदल उडत आहे. मध्यम व लहान प्रकारचे विविध मासे डोम्यात मिळत आहेत. यामध्ये खवळा, डेकमा, शेंगाही, मळवा, काडी तसेच इतर माशांचा प्रामुख्याने समावेश आहे. शेवटच्या पावसापर्यंत हे मासे मिळत राहतील, असे काही हौशी मासेमारांनी सांगितले.

Web Title: The beginning of the harvest of fish ranch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.