काँग्रेसचे उपोषण मागे; तिढा कायम
By admin | Published: February 2, 2016 11:57 PM2016-02-02T23:57:58+5:302016-02-02T23:57:58+5:30
तहसीलदारांची मध्यस्थी : सुंदरवाडी महोत्सवासाठी पर्यायी जागा शोधणार
सावंतवाडी : सुंदरवाडी महोत्सवाला नगरपालिकेने जागा नाकारल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने पुकारलेल्या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रशासनाच्यावतीने तहसीलदार सतीश कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन महोत्सवाला पूर्ण सहकार्याची हमी दिली; पण जागेबाबत तोडगा काढला नाही. महोत्सव सावंतवाडीतच होईल, यासाठी अन्य जागेचा पर्याय शोधण्यात यावा, असे आवाहन त्यांनी उपोषणकर्त्यांना केले. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर काँग्रेसने आपले उपोषण मागे घेतले.
काँग्रेसच्यावतीने सुंदरवाडी पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचे ठरवले होते. यासाठी नगरपालिकेकडे जिमखाना मैदानासाठी रीतसर अर्ज केला होता. मात्र, पालिकेने काँग्रेसचा अर्ज स्वीकारला असतानाच अवघ्या आठवड्यानंतर म्हणजेच १८ जानेवारीला ग्रामीण विकास विभागाच्या कोकण सरस महोत्सवासाठी जिमखाना मैदान उपलब्ध करून दिले आहे. यावरून काँग्रेस व पालिकेत वादाची ठिणगी पडली होती. मात्र, प्रशासन मैदान न देण्यावर ठाम राहिले होते. याबाबतचे पत्रही मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी काँग्रेसला दिले आहे.
पालिकेच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने नगरपालिकेसमोरच उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळपासून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पालिकेसमोर उपोषण केले. यामध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, काँग्रेस नेते विकास सावंत, सभापती प्रमोद सावंत, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, मंदार नार्वेकर, माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, प्रकाश कवठणकर, एकनाथ नाडकर्णी, प्रमोद गावडे, रवी मडगावकर, गुरुनाथ पेडणेकर, राजू मसूरकर, वासुदेव परब, अन्वर खान, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, प्रियांका गावडे, साक्षी वंजारी, अलिशा माठेकर, प्रतिभा सुकी, रेश्मा सावंत, श्वेता सावंत, राखी कळंगुटकर, आदींनी सहभाग घेतला होता.
शिवसेना सोडून सर्वांचा पाठिंबा
व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, भाजपचे आनंद नेवगी, बाळा बोर्डेकर, महेश कोरगावकर, भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, शैलेश तावडे, महेश पांचाळ, विकी केरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गोविंद बाळा वाडकर, गजानन सावंत, आदींनी भेट देऊन उपोषणाला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. या पाठिंब्यात शिवसेना वगळता सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
(प्रतिनिधी)
प्रशासनाने चांगल्या कार्यक्रमाच्या मागे राहिले पाहिजे; पण तसे होताना दिसत नाही. ग्रामीण विकास विभाग हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत नाही. त्यामुळे यावर शासनानेच तोडगा काढावा.
- सतीश सावंत,
काँग्रेस जिल्हाध्यक्ष
नगराध्यक्षांची उपोषणस्थळी भेट
४नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. प्रत्येक कार्यक्रमाला पालिका सहकार्य करत असते. कोकण सरस कार्यक्रम राज्य शासनाचा असल्याने त्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
४मात्र, मी स्वत: प्रशासनाशी याबाबत चर्चा करून चांगला निर्णय घेऊ. आम्ही आतापर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला मैदान नाकारले नाही. गेल्यावर्षीच्या काँग्रेसच्या महोत्सवाला सर्व सहकार्य केले आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली. तसेच यावेळीही पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन साळगावकर यांनी दिले.