‘पर्ससीन’विरोधी उपोषण मागे
By admin | Published: October 6, 2015 10:23 PM2015-10-06T22:23:48+5:302015-10-07T00:01:32+5:30
मत्स्योद्योगमंत्र्यांचे आश्वासन : वैभव नाईक यांची मध्यस्थी
मालवण : दांडी येथील युवा मच्छिमार अन्वय प्रभू यांनी सोमवारी सायंकाळी खोल समुद्रात सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी सायंकाळी २४ तासानंतर मागे घेतले. आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे यांनी कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पर्ससीन हायस्पीड ट्रॉलर्सचे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. तसेच विनापरवाना मिनी पर्ससीनच्या धुमाकूळने पारंपरिक मच्छिमार वैतागला आहे. या विरोधात प्रभू यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते.
दरम्यान, उपोषण सुरू झाल्यापासून मत्स्य विभागाने राबविलेले कारवाईचे धोरण, वेंगुर्ले तालुक्यात पकडलेल्या विनापरवाना मिनी पर्ससीन नौका व आमदार नाईक यांच्या पुढाकाराने मत्स्योद्योग मंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंती तूर्तास १६ आॅक्टोबरपर्यंत बेमुदत उपोषण मागे घेत असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. शिवसेना नगरसेविका सेजल परब यांच्या हस्ते जलप्राशन करून उपोषण सायंकाळी स्थगित केले. किल्ले सिंधुदुर्गच्या मागील बाजूस सात वाव (किनारपट्टीवरून अंदाजे ४ किलोमीटर अंतरात) खोल समुद्रात नांगर न टाकलेल्या बोटीत बसून प्रभू यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला छोट्य़ा मच्छिमार व महिला मत्स्य व्यावसायिकांनी पाठिंबा दर्शवला.
खडसे यांच्याकडून कारवाईची ग्वाही
प्रभू यांच्या उपोषणाबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात महसूल तथा मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेत या समस्येबाबत माहिती दिली. पर्ससीन ट्रॉलर्सच्या अतिक्रमणामुळे छोट्या पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय होत आहे. तरी मत्स्य विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तर उपोषणकर्त्या प्रभू यांच्याशी चर्चा करण्याचीही विनंती केली. याबाबत मंत्री खडसे यांनी पर्ससीनवर कारवाईसाठी तत्काळ मंत्रीस्तरावर बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उपोषणकर्त्या प्रभूंशी चर्चा करून पर्ससीन हायस्पीडसह मिनीपर्ससीनवर कारवाईची ग्वाही दिली.
सर्वपक्षीय पाठिंबा
या उपोषणाला भाजपने सोमवारी पाठिंबा दर्शविला होता. मंगळवारी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर, तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, शिवसेनेचे बबन शिंदे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब यांनी आंदोलनस्थळी जाऊन उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी रत्नागिरी येथील मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष यांनीही उपोषणस्थळी प्रभू यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला.