देवबागवासीय भीतीच्या छायेखाली
By admin | Published: June 13, 2014 01:40 AM2014-06-13T01:40:28+5:302014-06-13T01:43:36+5:30
महाकाय लाटांनी बंधारा उद्ध्वस्त : समुद्रात तिसऱ्या दिवशीही लाटांचे तांडव
मालवण : देवबाग गावास काल, बुधवारपासून सागराच्या अजस्त्र लाटांनी धडका देण्यास सुरुवात केल्याने देवबागवासीय भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. गेल्या दोन दिवसांत सागराच्या महाकाय लाटांनी देवबाग ख्रिश्चनवाडी येथील शासनाने २० वर्षांपूर्वी घातलेला बंधारा उद्ध्वस्त केला आहे. आज, गुरुवारी पौर्णिमा असल्याने समुद्राच्या उधाणाच्या लाटांना जोर होता. समुद्राच्या महाकाय लाटा देवबाग गावावर धडकत आहेत.
दरम्यान, देवबागची तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बुधवारी मध्यरात्री देवबागमधील शालिनी सुर्वे या अपंग व गरीब कुटुंबाचे झोपडीवजा घर उद्ध्वस्त झाले आहे.
दोन दिवस सुरू झालेल्या मान्सून पावसाने किनारपट्टीवर हाहाकार माजवला. सागराच्या अजस्त्र लाटा किनारपट्टीवरील वस्तीत घुसल्याने संपूर्ण किनारपट्टी भीतीच्या छायेत वावरत आहे. देवबाग येथे काही ठिकाणी कमी उंचीच्या बंधाऱ्यामुळे लाटा वस्तीत घुसल्या. (प्रतिनिधी)
बंधारा केला उद्ध्वस्त
लाटांनी बंधाऱ्याला जोरदार धडक दिल्याने ख्रिश्चन वाडीतील बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या ठिकाणच्या बंधाऱ्याचे दगड ५० ते ७० फूट लांबवर जाऊन पडले होते. देवबाग ख्रिश्चनवाडी येथे २० वर्षांपूर्वी सागराच्या अजस्त्र लाटांनी तडाखा दिला होता. त्यावेळी बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा कमी उंचीचा असल्याने लाटांनी तो पार केला.
तिसऱ्या दिवशीही धोक्याचा बावटा
सध्या किनारपट्टीवर ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, बंदर विभागाने तिसऱ्या दिवशीही धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा लावला आहे. दरम्यान, मालवणचे निवासी नायब तहसीलदार सावंत यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत देवबागची पाहणी केली व पंचनामे केले.
देवगड किनारपट्टीवरही उधाण
गेले दोन दिवस देवगड किनारपट्टीवर उधाण आले आहे. त्यामुळे समुद्राच्या अजस्त्र लाटा किनारपट्टीवर आदळत आहेत.
कुडाळात पावसाचे पाणी, कचरा रस्त्यावर; गेला गटार कुणीकडे?