रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लावल्या जाताहेत पैजा; निकालाकडे साऱ्यांचे लक्ष
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 28, 2024 06:49 PM2024-05-28T18:49:00+5:302024-05-28T18:49:55+5:30
महायुती, महाविकास आघाडीमध्ये झाली दुरंगी लढत
सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पाच टप्प्यांत मतदान घेण्यात आले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आता महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांसाठीची प्रक्रिया संपली आहे. आता ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, त्याआधी भाजप की मशाल, कोणता उमेदवार विजयी होईल, याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी पैजा लावल्या जात आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आणि उद्धवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत झाली आहे. एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी ही लढत दुरंगी असणार आहे. महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या जागेवर आपलाच उमेदवार विजयी होईल, असा दावा करण्यात येत आहे.
९ उमेदवार लोकसभेच्या मैदानात
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यंदा एकूण ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, महायुतीचे भाजपचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत या उमेदवारांमध्येच या ठिकाणी थेट लढत होणार आहे.
९,०७,६१८ मतदारांनी बजावला हक्क
७ मे रोजी झालेल्या निवडणुकीत ४ लाख ५९ हजार ९९ पुरुष आणि ४ लाख ४८ हजार ५१८ स्त्रिया अशा एकूण ९ लाख ७ हजार ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
अनेकांनी लावल्या पैजा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात खरी लढत दुरंगी आहे. या लढतीत दोन्ही उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे रत्नागिरीचे नागरिक नेमके कुणाच्या पारड्यात मत टाकतात यावर अनेकांनी पैजा लावायला सुरुवात केली आहे.
मतदार कोणाच्या पाठीशी?
नारायण राणे : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजप की शिंदेसेना या दोघांमध्ये उमेदवारीवरून शेवटपर्यंत रस्सीखेच होती. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली आणि ते महायुतीचे उमेदवार झाले. त्यामुळे त्यांच्या पाठीशी लोक उभे राहतात काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विनायक राऊत : मागील दोन टर्म खासदार असलेले उद्धवसेनेचे सचिव विनायक राऊत यांना निवडणुकीच्या आधीच दोन महिने तिकीट जाहीर झाले होते. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, राणे आणि राऊत यांच्यात आता कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.