दरड कोसळून भुईबावडा घाट बंद
By admin | Published: August 5, 2016 11:12 PM2016-08-05T23:12:49+5:302016-08-06T00:28:11+5:30
वाहतूक फोंडामार्गे : पुरामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग ठप्प
वैभववाडी : संततधार पावसामुळे दरड कोसळून भुईबावडा घाटमार्ग शुक्रवारी दुपारपासून बंद झाला आहे, तर पुराच्या पाण्यामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग पूर्णपणे ठप्प झाल्याने कोल्हापूर विजयदुर्ग मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, तालुक्यात दिवसभर मुसळधार पाऊस सुरू
असून, नद्या, नाले दुथडी वाहत आहेत. परंतु, पावसाने नुकसान झाल्याची नोंद नाही.
गेल्या तीन-चार दिवसांपासून वैभववाडी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी आठपर्यंत ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुपारी बाराच्या सुमारास भुईबावडा घाटात रिंगेवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर दरडीसह झाडे रस्त्यावर कोसळून घाटमार्ग बंद झाला. कोसळलेल्या दरडीचा ढिगारा अर्ध्या रस्त्यावर आला होता. मात्र, दरडीसह कोसळलेल्या झाडांमुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. त्यामुळे गगनबावड्याहून भुईबावड्याकडे येणारी वाहने घाटात उशिरापर्यंत अडकून पडली होती. सायंकाळी उशिरापर्यंत घाटमार्ग सुरळीत झाल्याची माहिती बांधकाम विभागाकडून मिळू शकली नव्हती.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढल्यामुळे तुडुंब भरल्याने विजयदुर्ग कोल्हापूर राज्यमार्गावर कळे, मांडुकली, आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे सकाळी साडेअकरानंतर गगनबावडा-कोल्हापूर मार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. कोल्हापूरकडे जाणारी वाहने रोखण्यासाठी पोलिसांनी गगनबावडा येथे रस्त्यावर बॅरिकेटर्स लावले असून पोलीस कर्मचारीही तैनात केले आहेत.
दरम्यान, करुळ व भुईबावडा घाट चढून गगनबावडा येथे पोहोचलेली अवजड वाहने गगनबावड्यातून माघारी न परतता तेथेच थांबली होती. पावसाचा जोर न ओसरल्यास पुढील दोन ते तीन दिवस गगनबावडा कोल्हापूर मार्ग बंद राहण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तर संततधार पावसामुळे करुळ आणि भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे.
संततधार सुरूच
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून संततधार सुरूच असून, कोठेही मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त नाही. भुईबावडा येथील दरड पावसाने कोसळण्याची एकमेव घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालूच होती.