भराडीच्या चरणी भक्तांची मांदियाळी
By admin | Published: March 2, 2017 11:38 PM2017-03-02T23:38:55+5:302017-03-02T23:38:55+5:30
लाखो भाविक नतमस्तक : मोडयात्रेने आज सांगता
आंगणेवाडी (ता. मालवण) : आई भराडी देवीच्या चरणी लाखो भाविक लीन होत अवघी आंगणेवाडीनगरी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन गेली. गुरुवारी पहाटे अडीच वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. सायंकाळपासून भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी फुलून गेली.
मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे यात्रा सुरळीत पार पडली. यात पोलिस प्रशासन, ग्रामस्थ मंडळ तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चोख नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात येत होते. यात्रेत अनुचित प्रकार अथवा अपघात घडू नये यासाठीही विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे राजकीय नेते तसेच सिनेकलाकार यांचीही उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली.
आंगणेवाडी मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र दहा रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो पोलिस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरेही यात्रोत्सवावर लक्ष ठेवून होते. रात्री भाविकांच्या गर्दीने व आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून गेला होता. आज, शुक्रवारी मोडयात्रेने आंगणेवाडी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.(प्रतिनिधी)
फडणवीस सरकार पाच वर्षे पूर्ण करेल : विनोद तावडे
आई भराडीच्या कृपाआशीर्वादामुळे भाजपला गेल्या दोन वर्षांतील प्रत्येक निवडणुकीत भरभरून यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काम करण्याच्या धडाक्यामुळे भाजपचा राज्यातील वारू सुसाट सुटला आहे. कोणी काहीही म्हणो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार राज्यात पाच वर्षे यशस्वी पूर्ण करेल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
राजकीय नेत्यांची उपस्थिती
आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात पहिल्या दिवशी ५ ते १० लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार तथा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह अनेक राजकीय नेते देवीचरणी लीन झाले.
खाजाची आवक वाढली
आंगणेवाडी यात्रेत विविध प्रकारची दुकाने सजली होती. सर्वाधिक मागणी मालवणी खाजाला होती. तसेच मिठाई, हॉटेल, कपडे, अन्य प्रकारच्या सर्व गृहोपयोगी वस्तू, खेळणी यांनी सजलेल्या दुकानात मोठी गर्दी होती. व्यापाऱ्यांची कोट्यवधीची उलाढाल झाली.
आम्ही सामना जिंकला : शेलार
मुंबई महापालिकेत भाजपला सत्ता मिळण्यासाठी भराडी देवीकडे नवस बोललो होतो. अतिशय प्रतिष्ठेचा बनलेला सामना आम्ही जिंकला आहे. पारदर्शी आणि भ्रष्टाचारविरहित कारभार केला जाईल. मुंबईचा महापौर कोणाचा बसणार याबाबतचा निर्णय भाजप कोअर कमिटी घेईल, असे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.