भजन हे कोकणच्या घराघरातील श्रद्धेचे प्रतिक
By admin | Published: August 31, 2015 09:31 PM2015-08-31T21:31:53+5:302015-08-31T21:31:53+5:30
संतोष तळेकर : तळेरे भजन मंडळाला अनेक पिढ्यांचा वारसा--आले गणराया
निकेत पावसकर -नांदगाव -गणेशोत्सव जसजसा जवळ येऊ लागतो तसतसा कोकणातील प्रत्येक गावागावात भजनाचे सूर ऐकू येतात. प्रार्थना, भजन, रुपावली, गजर, अभंग, गौळण, भारुड, कव्वाली व गजर यांचे वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण शब्द, रचना अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात. कणकवली तालुक्यातील तळेरे गावचे श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ म्हणजे गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा असून सध्या संगीत भजनामध्ये बुवा संतोष तळेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्ह््यासह विविध ठिकाणी आपला दबदबा निर्माण केला आहे. तळेरेसह अनेक ठिकाणच्या रात्री या गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या भजन मेळ्यांनी जागू लागतात.गणेशोत्सव आणि भजन मेळे, त्यातील हरीनामाचा गजर हा कोकणातील श्रद्धेचे प्रतिक आहे. गणेशोत्सव काळात तर प्रत्येकाच्या घरी भजनाचे मेळे रंगताना दिसतात. तळेरे येथील संगीत भजनीबुवा संतोष तळेकर यांना तळेरे भजन मंडळाची वाटचाल व त्यांच्या भजन कलेबाबत विचारले असता ते म्हणाले की, वयाच्या बाराव्या वर्षापासून मला भजनाची आवड होती आणि तळेरे गावाला तर फार वर्षांपूर्वीपासूनची भजन परंपरा आहे.संगीत भजनामध्ये मधुकर तळेकर हे सुप्रसिद्ध भजनीबुवा होऊन गेले. त्यापासून सुरु झालेली ही भजन परंपरा आम्ही चालवत आहोत. १९९८ साली मी मुंबईवरुन गावी आलो आणि संगीत भजनाला सुरुवात केली. त्यापूर्वी प्रमोद खटावकर, अविनाश तळेकर हे तरुण भजनीबुवा हे भजन मंडळ चालवत होते. सुप्रसिद्ध भजनीबुवा गुणाजी पाळेकर यांच्यामुळेच मी संगीत भजनाकडे वळलो. त्यांनी संगीत भजनाची गोडी निर्माण केली.ग्रामस्थ व श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या सहकार्यामुळेच आज आमची वाटचाल सुरु आहे. पुढे बोलताना तळेकर म्हणाले की, गणपतीच्या अकरा दिवसात तर आमची सत्तर सत्तर भजने होतात. तरीदेखील वेळ पुरत नाही. आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविधर् िठकाणासह रत्नागिरी, गगनबावडा, पाचल, नालासोपारा अशा विविध ठिकाणी हजारो भजने सादर केली. विविध भजन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यशही मिळविले आहे. विविध ठिकाणी रसिक प्रेक्षकांकडून आमच्या संगीत भजनाला मिळणारा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या असतात. त्याच आम्हाला आमच्या पुढील वाटचालीसाठी महत्वाच्या ठरतात. त्यातही प्रत्येकवेळी आम्ही आमच्या भजनांमधून नवनवीन देण्याचा प्रयत्न करीत असतो. तसा आमचे गुरुवर्य अजित गोसावी यांचाही आग्रह असतो.
गणेशोत्सव आणि भजन म्हणजे कोकणी माणसाच्या धार्मिकतेचे प्रतिक आहे. हीच भजन कला आम्ही जपली आणि पुढील पिढीही अत्यंत आवडीने त्यात सहभाग घेत आहेत. या सीडीसाठी दर्शन घाडीगावकर (मृदूंगमणी), विकास नर (तबला व ढोलकी), अंकित घाडीगावकर (झांज) असून कोरस म्हणून प्रमोद खटावकर, अनिल मेस्त्री, अमोल सोरप, संतोष मेस्त्री, तुषार तळेकर, प्रणय तळेकर, प्रविण तळेकर, कल्पेश तळेकर, अक्षय तळेकर, तेजस तळेकर, चेतन वरुणकर, संतोष तळेकर यांनी काम केले.
तळेरे भजन मंडळाचे संगीत भजन मधुकर तळेकर तर वारकरी भजन पबा खटावकर, पांडुरंग खटावकर, बापू राणे, प्रवीण उर्फ बाळा तळेकर यांच्यासह अनेकांनी चालविले. त्यानंतर मध्यंतरी अविनाश तळेकर व प्रमोद खटावकर यांनी ही भजन परंपरा सुरु ठेवली. त्यानंतर गेल्या चार वर्षापासून मी संगीत अलंकार अजीत गोसावी यांच्याकडे संगीत भजनाचे धडे घेत आहे. या सर्व प्रवासात तरुणांची एक चांगली टीम तयार केली.
- संतोष तळेकर, भजनीबुवा तळेरे