बाप्पाच्या स्वागतात भक्त दंग

By admin | Published: September 17, 2015 11:21 PM2015-09-17T23:21:01+5:302015-09-17T23:44:50+5:30

पावसाचीही उसंत : मिरवणुकांनी गणराया घरोघरी दाखल

Bhakta Dang | बाप्पाच्या स्वागतात भक्त दंग

बाप्पाच्या स्वागतात भक्त दंग

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात १ लाख ६५ हजार १०७ गणेशमूर्तींची आज सकाळपासून वाजतगाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. आज पावसानेही काहीशी उसंत घेतल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला पारावार राहीला नव्हता. जिल्ह्यात १ लाख ६५ हजार घरगुती तर १०७ सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. ज्याची भक्त कित्येक दिवसांपासून आतुरतेने प्रतीक्षा करत होते, त्या विघ्नहर्त्याचे गुरुवारी उत्साहात आगमन झाले. गेले दोनदिवस जिल्ह्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आज सकाळपासूनच थोडी उघडीप घेतली होती. त्यामुळे गणेश मिरवणुकीला वातावरण मोकळे होते. शहरानजिकच्या कर्ला, आंबेशेत येथील मानाच्या समजल्या जाणाऱ्या गणपतींचे तसेच या भागातील घरगुती गणपतींचेही आगमन एकाच भव्य मिरवणुकीने झाले. या मिरवणुकीसाठी फलटण येथील झांज पथक बोलाविण्यात आले होते. झांज पथकासह बहुसंख्य भक्तांनी भगवा पोशाख केल्याने मिरवणुकीचे वातावरण भगवामय झाले होते.रत्नागिरीत विविध ठिकाणी मिरवणुकीने गणराया दाखल झाले. दूरवर असलेल्या भक्तांनी गणेशमूर्ती बुधवारीच नेल्या. मात्र, पाऊस असल्याने बुधवारी मिरवणुका निघाल्या नाहीत. गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर वातावरण ढगाळ होते. मात्र, पावसाची बरसात झाली नाही. त्यामुळे दुपारनंतरही अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात, मिरवणुकीने बाप्पांना घरी नेण्यात येत होते.गुरुवारी बाप्पा घरी येण्याच्या दिवशी बसेसची व्यवस्थाही चोख करण्यात आली होती. मुंबईहून आलेल्या बसेसही वेळेत धावत होत्या. त्यामुळे भक्तगण वेळेत घरी पोहोचण्यास मदत झाली. महामार्गावर यावर्षी म्हणावा तसा वाहतूक कोंडीचा ताण आला नसल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.बाजारपेठेसह शहरातील सर्व दुकाने आज बंद होती. अत्यावश्यक सेवा समजली जाणारी औषधांची दुकानेही आज बंद होती. शहरभर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. गतवर्षी १०७ सार्वजनिक गणेशमूर्ती, तर १ लाख ५९ हजार ५४४ घरगुती गणेशमूर्तींची प्रष्ठिापना करण्यात आली होती. यावर्षी घरगुती गणेशमूर्तींच्या संख्येत ५६५0ने वाढ झाली आहे. दरम्यान, गुरुवारी बाजारपेठ बंद असली तरीही शहरात सायंकाळी होणारी ग्राहकांची गर्दी लक्षात घेता रामआळी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मारूती आळी, धनजी नाकामार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. दिवसभर रत्नागिरीची मुख्य बाजारपेठ बंद असल्याने रस्त्यावरची रहदारीही कमी दिसत होती. मिरवणुकांच्यावेळी मात्र भक्तगणांची गर्दी झालेली दिसत होती. सायंकाळच्या सत्रात मात्र काही दुकाने उघडली गेली. त्यावेळी पुन्हा भक्तगणांची गर्दी झाल्याचे चित्र होते.दरम्यान दीडदिवसाच्या गणेशमूर्तींचे शुक्रवारी विसर्जन करण्यात येणार आहे. त्यानंतर पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होईल. (प्रतिनिधी)


आंबेशेत येथील गणेश मिरवणुकीचे वातावरण भगवेमय झाले होते. यात काही भक्त पौराणिक वेषात सहभागी झाले होते. आज पावसानेही कृपा केल्याने गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
रत्नागिरी शहराच्या मुख्य मार्गावरील नेहमीच्या फळविक्रेत्यांनी आज पहाटेपासूनच विक्रीस सुरूवात केली होती. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना फळे सहजच उपलब्ध झाली होती. फुलेविक्रेत्यांचीही विक्री आज तेजीत सुरू होती.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भक्तांची संख्या अजूनही वाढती आहे. आज कोकण रेल्वे, एस. टी. बसेस यांनाही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. खासगी वाहनांमधूनही अनेक भक्तांचे आगमन झाले. सध्या गणेशोत्सवाची धूम चांगलीच रंगात आली आहे.


सेल्फीचं वेड
सध्या सेल्फीचे फॅड अधिकच वाढले आहे. प्रत्येकाला आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. सेल्फीने प्रत्येकावर गारूड केले आहे. त्याचा प्रभाव या मिरवणुकीवरही दिसला. मिरवणुकीतील काही हौशी भक्त मध्येच थांबून सेल्फी काढण्यात मग्न होते.

Web Title: Bhakta Dang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.