भंडारा नगर पालिकेला पावला ‘मार्च एन्ड’
By Admin | Published: April 3, 2015 12:23 AM2015-04-03T00:23:30+5:302015-04-03T00:23:30+5:30
मालमत्ता कर चुकविणाऱ्या करधारकांविरोधात नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कधी
तिजोरीत २.५ कोटी जमा : वसुलीचा आकडा २० टक्क्याने वाढला
भंडारा : मालमत्ता कर चुकविणाऱ्या करधारकांविरोधात नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कधी नव्हे एवढा अडीच कोटी रुपयांचा महसूल भंडारा नगर पालिकेला प्राप्त झाला आहे. ही मोहीम आणखी १५ दिवस सुरू राहणार आहे.
मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी महसुलात २० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. एक ते सव्वा लाख लोकसंख्येच्या भंडारा शहरात मालमत्ता करातून नगर पालिकेला कोट्यवधींचा महसूल मिळत असतो. परंतु, मालमत्ताधारक कर भरण्यास इच्छुक नसतात. कर न भरल्यामुळे महसुलात तूट निर्माण होते व पालिकेला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पालिकेत होते.
तथापि, यावर्षी मालमत्ता कराचे देयके घरोघरी पोहचविण्यात आल्यानंतर कर भरण्यासाठी पालिकेकडून वारंवार जागृती करण्यात आली. शहरात दवंडी पिटून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले. रविवार व सुटीच्या दिवशीसुद्धा पालिकेच्या कार्यालयात कर भरण्याची सुविधा करून दिली होती.
या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांनी करवसुली पथक तयार करून ज्यांचे कर थकित आहेत, त्यांच्याकडून कर वसूल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, या पथकाने घरोघरी जाऊन अधिकाधीक कर वसुलीचे उद्दिष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. जे नागरिक कर भरणार नाही, त्यांची मालमत्ता सील करण्याचा इशारा दिल्यानंतर थकबाकीदारांनी कर भरून सहकार्य केले. पालिका प्रशासनाने या कठोर निर्णयामुळे भंडारा पालिकेकडे मालमत्ता करापोटी अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत. आणखी १५ दिवस कर वसुलीची मोहीम सुरू राहणार असल्याने या महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
शहरातील दोन टॉवर केले सील
शहरातील मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी अनेकदा सांगण्यात आल्यानंतरही ज्यांनी सहकार्य केले नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शहरातील टॉवरधारकांनी कर न भरल्यामुळे दोन टॉवर सील करण्यात आले. नऊ टॉवरपैकी तीन जणांनी कर भरला असून ऊर्वरित सहा टॉवरधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जप्ती कारवाई टाळा
कर वसुली करण्यासाठी पालिकेने स्पष्ट धोरण आखले. मालमत्ताधारकांनी कर भरावे, असा प्रयत्न आहे. परंतु, काही नागरीक कर भरत नसल्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश दिले. हा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी थकित कर तातडीने भरुन जप्तीची कारवाई टाळावी.
- बाबूराव बागडे,
नगराध्यक्ष, भंडारा.