भरतची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली!

By admin | Published: June 15, 2017 12:03 AM2017-06-15T00:03:43+5:302017-06-15T00:03:43+5:30

भरतची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली!

Bharata's premature exit was a click! | भरतची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली!

भरतची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली!

Next


वैभव साळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दोडामार्ग : विजेची समस्या असो अथवा रस्त्याची, भरतला समजली की ती दूर होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करून मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ न बसणाऱ्या भरतची अकाली एक्झिट तालुकावासीयांना चटका लाऊन गेली. खास करून आयी पंचक्रोशी तर अक्षरश: शोकसागरात बुडाली. पंचायत समिती सदस्य भरत जाधव यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच रूग्णालयात धाव घेणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून आमचो भरत गेलो...आमच्यासारख्या गरिबांचो आधार गेलो...असेच भावनिक उद्गार बाहेर पडत होते. खरंच! सर्वसामान्यांचा आधार आणि गोरगरिबांचा नेता हरपल्याच्या भावना भरतच्या अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होत्या.
भरत जाधव. एक सर्वसामान्य गोरगरीब परिस्थितीतीलच माणूस. मात्र, आपल्या भागातील लोकांच्या विकासाच्या तळमळीने नेहमी झपाटलेला एक विकासाभिमुख वेडा माणूस म्हटला तर ते वावगे ठरणार नाही. समस्या कोणतीही असो, भरतला समजली की त्याचा पाठपुरावा करून ती धसास लावेपर्यंत त्याला चैन पडत नव्हती. कोणाचे रेशनकार्ड, आधारकार्ड, विजेचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न अशा एक ना अनेक समस्या मार्गी लावण्यात आयी पंचक्रोशीला त्याचा मोलाचा हातभार लागला. रात्री-अपरात्री अपघात झाल्याचे समजल्यावर कोणतीही पर्वा न करता जखमींना दोडामार्ग ग्रामीण रूग्णालय आणि वेळ पडल्यास पुढे बांबोळी-गोव्यापर्यंत रूग्णांना घेऊन जाण्यास तो मागेपुढे पाहत नसे. आणि म्हणूनच आयी गावचा सरपंच, उपसरपंच आणि त्यानंतर मागासवर्गीय असूनही दोडामार्ग पंचायत समितीवर तो खुल्या प्रवर्गातून निवडून आला. मितभाषी स्वभाव आणि सर्वांमध्ये मिळून-मिसळून वागणाऱ्या भरतची तालुक्यात ‘अण्णा’ या नावाने एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. राजकारणापलीकडेही मैत्री कशी असावी, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भरत जाधव!
पास झाल्याचा आनंद औट घटकेचा ठरला
भरत जाधव यांचा पुतण्या दहावीच्या परीक्षेला मंगळवारी उत्तीर्ण झाला. ही माहिती जाधव यांना समजताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ओरोस येथे मंगळवारी ते काही कामानिमित्त आपल्या सहकाऱ्यांसमवेत गेले होते. त्यावेळी आपला आनंद सहकाऱ्यांसमोर व्यक्त करीत रात्री घरी जातेवेळी पेढे घेऊन निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. आणि पुतण्या पास झाल्याचा आनंदही औट घटकेचा ठरला. त्यामुळे भरतच्या त्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.
नवीन गाडी घेण्याचे स्वप्न राहिले अधुरे
भरत जाधव यांना नवीन कार घ्यायची होती. जुनी कार घेण्यापेक्षा नवीन घेतलेली बरी, असा आग्रह त्यांच्या मित्रपरिवाराने धरल्याने त्यांनी चौगुले शोरूममध्ये नवीन अल्टो कार बुक केली होती. मात्र, काळाने डाव साधल्याने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.
‘तो’ कॉल अखेरचा
भरत जाधव नेहमीच घरी रात्री ९.३० ते १०.३० च्या सुमारास जात असत. नेहमीप्रमाणे मंगळवारीही ते १०.१५ च्या सुमारास घरी जाण्यास निघाले. त्यापूर्वी त्यांना त्यांच्या पत्नीचा मोबाईलवर कॉल आला होता. उशीर झाल्याने घरी लवकर या, असे सांगण्यासाठी तिने फोन केला होता. मात्र ते संभाषण आणि कॉलही अखेरचे ठरले.
अंत्यदर्शनासाठी सर्वच स्तरातील लोकांची गर्दी
भरत जाधव यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरातील सर्वच लोकांनी गर्दी केली होती. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण नाईक, एकनाथ नाडकर्णी, राजू निंबाळकर, विवेकानंद नाईक, बाबुराव धुरी, चंदू मळीक, सूर्या नाईक, संदेश देसाई आदींनी जाधव यांचे अंत्यदर्शन घेतले. कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी केलेला आक्रोश हृदय हेलावणारा असाच होता.
अभ्यासू नेतृत्वापासून आयी पंचक्रोशी पोरकी
आयी पंचक्रोशीच्या विकासात भरत जाधव यांचा मोलाचा वाटा होता. आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, आपल्या भागातील सर्वसामान्यांच्या समस्या मार्गी लागल्या पाहिजेत, यासाठी नेहमीच त्यांची तळमळ होती. भरज जाधव म्हणजे आयी पंचक्रोशीचे उभरते नेतृत्व होते. मात्र, ‘भरत’च्या अशा अकाली जाण्याने आयी पंचक्रोशी उभरत्या नेतृत्वाला पोरकी झाल्याचे जाणवले. जाधव यांच्यावर सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Bharata's premature exit was a click!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.