लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जनमताची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:40 PM2019-03-09T13:40:04+5:302019-03-09T13:43:08+5:30
लोकसभा निवडणूकीचे पडघम जसे वाजू लागले आहेत तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकारण दिवसेंदिवस गरम होताना दिसत आहे. ११ मार्च रोजी भाजपा जिल्हा कार्यकारिणीची विस्तृत बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे होणार आहे. या बैठकीआधी जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना, समस्या समजून घेण्याकरिता भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूकीचे पडघम जसे वाजू लागले आहेत तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकारण दिवसेंदिवस गरम होताना दिसत आहे. ११ मार्च रोजी भाजपा जिल्हा कार्यकारिणीची विस्तृत बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे होणार आहे. या बैठकीआधी जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना, समस्या समजून घेण्याकरिता भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
सिंधुदुर्ग भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत. ७ मार्च पासून पदाधिकाऱ्यांच्या दौºयाला प्रारंभ झाला. दोडामार्ग ,सावंतवाडी, मालवण असा दौरा करण्यात आला. ८ मार्च रोजी देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकांना भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर उपस्थित होते. तर या संपूर्ण दौºयात सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस जयदेव कदम, प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, यशवंत आठलेकर आढावा घेण्यासाठी अतुल काळसेकर यांच्यासह उपस्थित होते.
दरम्यान, भाजपा-शिवसेना युती जाहीर झाल्यानंतर विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवरून सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाराजीचा सूर लावला होता.
त्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्यांचीच री ओढत बंड पुकारले होते. त्यानंतर अतुल काळसेकर यांनी खासदार विनायक राऊत यांनी पक्षपाती राजकारण केल्याचा आरोप केला होता. तसेच काळसेकर यांनी युतीच्या निर्णयाचे स्वागत केले होते.
२०१४ च्या निवडणुकीत राऊत यांच्या विजयात स्वत: काळसेकर, प्रमोद जठार, रत्नागिरीचे बाळ माने यांचा मोलाचा वाटा होता, परंतु राऊत यांनी विजयानंतर सिंधुदुर्ग भाजपाशी कायमच पक्षपाती धोरण अवलंबत विकास निधीसाठी कायमच ठेंगा दाखवला शिवाय कोणत्याही कार्यक्रमांनासुद्धा निमंत्रित केलेले नाही, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
जिल्ह्यात विकास कामे करण्यात खासदार विनायक राऊत अपयशी ठरले असून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी खऱ्या अर्थाने जिल्ह्यात विकासकामे आणली असून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभू यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे.
एकंदरच युती मधील ताणली गेलेली परिस्थिती, प्रमोद जठार यांनी घेतलेले बंडाचे धोरण पाहता अतुल काळसेकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा दौरा आणि त्यानंतर सिंधुदुर्ग भाजपा काय निर्णय घेणार आणि लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना मदत होणार का? याबाबत जनतेमध्ये औत्सुक्य आहे.