पावसाअभावी भातलागवडीचा खोळंबा
By admin | Published: July 8, 2017 10:39 PM2017-07-08T22:39:47+5:302017-07-08T22:39:47+5:30
कडकडीत ऊन : शेती बनली खर्चिक, जिल्ह्यात पाऊस अघोषित संपावर, रोपे सुकण्याची वेळ, शेतकरी चिंतेत
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १०८८.४० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाच्या पाण्यावर येथील भातशेती अवलंबून असल्याने व सध्या पाऊस गायब असल्यामुळे भातशेती लागवडीला विलंब होत आहे. कडकडीत ऊन पडत असल्यामुळे पंपाच्या पाण्यावर सध्या भातशेती लागवड सुरू असल्याने ती खर्चिक बनली आहे.
जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ७० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक म्हणून नागलीही लावण्यात येते. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जाते. ८०९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ११८० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला तसेच ८२५९ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य व १०० हेक्टर क्षेत्रावर गळीतधान्य घेण्यात येते. जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने भातलागवड करण्यात येत असली, तरी येथील भातशेती ही मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे. गतवर्षी दि. ८ जुलै अखेर सरासरी १४३६.४५ मिलिमीटर पाऊस पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी ३५९.०१ मिलिमीटर इतका कमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर भातलागवड करण्यात येते. मात्र, पावसाअभावी आतापर्यंत ३२ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रावरील भात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात येते. मात्र, आतापर्यंत ५२८ हेक्टर क्षेत्रावर ही लागवड करण्यात आली असून, ५३ हेक्टर क्षेत्रावर वरीची लागवड पूर्ण झाली आहे. भाजीपाला लागवड ५१४ हेक्टरवर करण्यात आली असून, गळीत धान्यापैकी भुईमूग ५, कारले ६९, तीळ ३० मिळून एकूण १०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात लागवडीचे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजा चिंतेत आहे. लागवड पद्धतीने भातशेती करण्यात येत असल्याने रोपवाटिकेतून रोपे तयार होऊनसुद्धा पावसाअभावी शेतकऱ्यांना लागवड करणे अवघड बनले आहे. भातलागवड करताना चिखल करुन त्यामध्ये भाताची रोपे लावण्यात येतात. ही रोपे काढून पुन्हा दुसऱ्या शेतात लावण्यात आल्याने वरच्यावर ही लागवड असते. सध्या शेतकरी पंप भाड्याने घेऊन लागवड करीत असले, तरी पावसाच्या पाण्याअभावी ही रोपे वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे शेतात सोडलेले पंपाचे पाणीदेखील बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. मात्र, शेतकरीवर्ग आर्थिक भुर्दंड सोसून भातलागवडीच्या कामात व्यस्त आहे. पाण्याअभावी डोंगर, व कातळावरील शेतीची कामे रखडली आहेत. पाण्याची अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
भातलागवडीला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी पंप भाड्याने घ्यावा लागत असून, त्यासाठी तासाला २५० ते ३०० रूपये भाडे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. तर नांगरणीसाठी वापर होत असलेल्या पॉवर टिलरचे भाडे ३५० ते ४०० रूपये आकारले जात आहे. याचबरोबर स्त्री मजुरांची मजुरी दिवसाला १५० ते २०० रूपये तर पुरूष मजुरांची दिवसाला २०० ते २५० रूपये मजुरी आहे.
खते, कीटकनाशके, बियाण्यांचे दर वाढल्यामुळे भातशेती लागवडीसाठी शेतकऱ्यांना अधिक खर्च येत असून, त्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
तीन दिवस गायब : रोपे पिवळी पडू लागली
सिंचनाचे मोठे प्रकल्प जिल्ह्यात नसल्यामुळे उपलब्ध विहिरी, नदी, बंधारे व पाटाच्या पाण्यावर जिल्ह्यात लागवड सुरू आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाची एकही सर कोसळलेली नाही. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात ही शेती पिवळी पडू लागली आहे.