कणकवलीत ‘भिलवाडा रॅपिड टेस्ट’ पॅटर्न राबविणार : नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 04:57 PM2020-04-29T16:57:52+5:302020-04-29T17:01:30+5:30
कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, मंगळवार आठवडा बाजाराच्या दिवशी कणकवली शहरात गर्दी होऊ नये, आठवडा बाजार पूर्णत: बंद ठेवला जावा, फक्त जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकाने खुली राहतील.
कणकवली : कोरोना विरूद्धच्या लढ्यात ‘रॅपिड टेस्ट’ ही काळाची गरज आहे. प्रशासनाकडून हे काम होईल तोपर्यंत वाट पाहत बसण्यात काहीच अर्थ नाही. किमान नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट आपण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारे २० हजार ‘रॅपिड टेस्ट किट्स’ मी उपलब्ध करून देईन. केरळ राज्य व भिलवाडा जिल्ह्याने राबविलेला ‘रॅपिड टेस्ट’पॅटर्न कणकवलीत सुद्धा यशस्वीपणे राबवू, असा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केला.
कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, मंगळवार आठवडा बाजाराच्या दिवशी कणकवली शहरात गर्दी होऊ नये, आठवडा बाजार पूर्णत: बंद ठेवला जावा, फक्त जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकाने खुली राहतील. विनाकारण गर्दी होणार नाही. यासंदर्भात प्रशासन, व्यापारी, पोलीस अधिकारी यांच्यासमवेत आमदार राणे यांनी सविस्तर चर्चा केली.
मंगळवारी आठवडा बाजार पूर्ण बंद ठेवण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक विराज भोसले, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, संजय कामतेकर, बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, शिशिर परुळेकर यांच्यासह व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.
कणकवली कोरोनामुक्त?
शहरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्टसाठी नगरपंचायतीने प्रत्येक प्रभागनिहाय कर्मचारी नियुक्त करावेत. वैद्यकीय अधिकाºयांची मदत घेऊन ही टेस्ट केली जाईल. कोरोना रुग्ण पहिल्यांदा निगेटिव्ह रिपार्ट आले तरी २३ दिवसांनी पॉझिटिव्ह आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ‘रॅपिड टेस्ट’ ही प्रत्येकाची झाली पाहिजे. त्यानंतर उपचार करणे सोपे होईल. त्यासाठीचे किट्स मागवून घेतो आणि प्रभागनिहाय तपासणी करून कणकवली शहर कोरोनामुक्त असल्याचे जाहीर करू, असेही ते यावेळी म्हणाले.