भिरवंडेत ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 05:30 PM2021-03-17T17:30:02+5:302021-03-17T17:32:07+5:30
Farmer Sindhudurg- जनसंवादातून विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविली जाते. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली कशी येईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
कणकवली : जनसंवादातून विकासाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविली जाते. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात अधिकाधिक पडीक जमीन लागवडीखाली कशी येईल, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
भिरवंडे गावामध्ये सध्या ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम राबविला जात असून, त्याचा शुभारंभ जांभूळभाटलेवाडी येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, जांभूळभाटले सेवामंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष मोहन सावंत, सरचिटणीस सागर सावंत, कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नागेश सावंत, उपसरपंच नितीन सावंत, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन मंगेश सावंत, राजेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्या रश्मी सावंत, ग्रामसेवक राकेश गोवळकर, भाई सावंत, सुभाष सावंत, नंदकुमार सावंत, सुरेशचंद्र सावंत, सत्यवान सावंत, आबा सावंत, स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ उपस्थित होते.
जांभूळभाटले सेवामंडळाच्यावतीने सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच नितीन सावंत व सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, ग्रामसेवक राकेश गोवळकर यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना ग्रामविकासासाठी जांभूळभाटले सेवामंडळाचे सर्वतोपरी सहकार्य असेल, असे सागर सावंत यांनी सांगितले.
जांभूळभाटलेवाडीतील रखडलेल्या विकासकामांविषयी नागरिकांनी चर्चेतून सहभाग घेतला. ग्रामस्थांनी सुचवलेली कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत आवश्यक तो पाठपुरावा निश्चितपणे करेल, असे भिरवंडे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. आभार ग्रामसेवक राकेश गोवळकर यांनी मानले.
ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शासनाच्या योजना सक्षमपणे राबवाव्यात
गावचा विकास साधताना लोकसहभाग महत्त्वाचा असतो. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत शासनाच्या योजना अधिक सक्षमपणे राबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः पडीक जमिनीच्या विकासासाठी फळबाग लागवडीबरोबरच बांबू लागवडीकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जांभूळभाटले सेवामंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेत पडीक जमिनीमध्ये अधिक बांबू लागवड कशी होईल याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले.