अत्याधुनिक मासळी मार्केटचे भूमिपूजन
By admin | Published: September 1, 2014 09:47 PM2014-09-01T21:47:28+5:302014-09-01T23:56:56+5:30
मच्छिमार महिलांचा प्रश्न मार्गी : राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्डाची संकल्पना
आचरा : आचरा गाव विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर न्यावयाचा असल्यास पक्षीय राजकारण करत न बसता पक्षीय वल्कले बाजूला सारून विकास साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार किरण पावसकर यांनी केले. आचरा येथील नव्याने होणाऱ्या अत्याधुनिक मासळी मार्केट भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड हैद्राबाद यांच्या योजनेतून साकारणाऱ्या अत्याधुनिक मासळी मार्केट भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, मत्स्य उद्योग विकास मंडळाचे उपाध्यक्ष पुष्पसेन सावंत, स्वीय सहाय्यक अशोक पाडावे, मच्छिमार संघटना अध्यक्ष नारायण कुबल, मासळी मार्केटला जागा उपलब्ध करून देणारे उदय लाड, सुरेश ठाकूर, प्रदीप मिराशी, संतोष मिराशी, रविंद्र गुरव, मच्छिमार बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पावसकर म्हणाले की, आज आचऱ्यात ताजी मासळी उपलब्ध आहे. परंतु ती मासळी विकणारी महिला अनेक अडचणींना तोंड देत रस्त्यावर बसून मच्छि विक्री करते. मच्छि विकणाऱ्या महिलांची मच्छि विकताना मार्केट नसल्याने परवड होत होती. आज या महिलांना या मार्केटमध्ये १०३ गाळे उपलब्ध होणार असून पाणी, आसन व्यवस्था, शीतगृह यासारख्या सोयी उपलब्ध होणार आहेत. गावाच्या विकासासाठी आपल्या ग्रामस्थांची साथ आवश्यक असल्याचे ते म्हणाले. विकासासाठी एमटीडीसीच्या माध्यमातून आचरे गावासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले असून विकासाची रुपरेषा ठरविताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले पाहिजे.
मार्केटसाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून देणाऱ्या उदय लाड या जमिन मालकाचा आमदार पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला. (वार्ताहर)