भुईबावडा घाटात मार्ग सुरळीत : पडझड सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:57 AM2019-07-03T11:57:07+5:302019-07-03T11:59:38+5:30
भुईबावडा घाटात दरडीची दोन ठिकाणी किरकोळ पडझड झाली. परंतु, त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. दरम्यान, कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याचा उर्वरित भाग हटविण्याची मोहीम सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू आहे.
वैभववाडी : भुईबावडा घाटात दरडीची दोन ठिकाणी किरकोळ पडझड झाली. परंतु, त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. दरम्यान, कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याचा उर्वरित भाग हटविण्याची मोहीम सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू आहे.
तालुक्यातील पावसाचा जोर पूर्णत: ओसरला आहे. परंतु, तीन-चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात दोन ठिकाणी किरकोळ प्रमाणात दरड कोसळली. मात्र, दरडीची माती रस्त्यावर आली नसल्याने तिचा वाहतुकीला अडथळा झालेला नाही. रात्री कोसळलेल्या दरडीचा रस्त्यावरील ढिगारा हटवून मार्ग खुला केला होता.
मात्र, गटारातील ढिगारा शिल्लक होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळपासून दोन जेसीबींच्या सहाय्याने भुईबावडा घाटात कोसळलेल्या दरडी काढण्याची मोहीम हाती घेतली होती. दिवसभर हे काम सुरू होते. परंतु, त्याचा घाटातील वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. दरम्यान, दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने दरड हटविण्याचे काम वेगाने करण्यात आले.
पाऊस ओसरल्याने लावणीपूर्व मशागत सुरू
पावसाचा जोर ओसरल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पाऊस कमी झाला असला तरी पाणथळ शेतात मुबलक पाणी असल्याने भातलावणीला सुरुवात झाली आहे. तर उथळ भागातील शेतमळ्यांमध्ये लावणीपूर्व मशागत सुरू आहे.