Sindhudurg: भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 11:41 AM2023-07-28T11:41:46+5:302023-07-28T11:42:20+5:30
वैभववाडीत मुसळधार; नद्यांना महापूर : अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी
वैभववाडी : तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने दाणादाण उडवली आहे. सर्व नद्यांना महापूर आला असून कुसुर, दिगशी, तिरवडे तर्फ खारेपाटण, उंबर्डे या भागात रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. तर पावसामुळे भुईबावडा घाटात छोट्या दरडी कोसळल्या होत्या. त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवून मार्ग सुरळीत केला.
तालुक्यात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील तीन दिवसांत २८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे सर्व नद्यांना महापूर आला होता. त्यामुळे कुसुर सुतारवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे कुसुर भुईबावडा वाहतूक ठप्प झाली होती. उंबर्डे-तिथवली मार्गावर कातकरवाडी व दिगशी येथे पाणी आले होते. त्यामुळे या मार्गाची वाहतूक काही काळ बंद होती. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
संततधार पावसामुळे भुईबावडा घाटात दोन ठिकाणी छोट्या दरडी कोसळल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साह्याने त्या दरडी हटवून मार्ग सुरळीत केला. कोल्हापूर मार्ग बंद असल्याने सध्या घाटात वाहतूक कमी आहे. यामुळे दरड पडल्याचा फारसा परिणाम वाहतुकीवर जाणवला नाही.
तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घर, गोठे, संरक्षण भिंती कोसळून १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोकिसरे येथील संतोष पवार यांची संरक्षण भिंत ८० हजार, नाधवडे येथील अशोक गिते (गोठा) १२ हजार, आचिर्णे घाणेगडमधील जयवंत रावराणे घर ७० हजार, उंबर्डे मेहबूबनगर यासीन जेठी संरक्षण भिंत ६ हजार, आदम पाटणकर घर ४ हजार ५०० रुपये असे मिळून अतिवृष्टीमुळे १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.