चौपदरीकरणाचे ५ जूनला भूमिपूजन

By admin | Published: April 15, 2017 12:06 AM2017-04-15T00:06:55+5:302017-04-15T00:06:55+5:30

प्रमोद जठार यांची माहिती : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेस मंजुरी

Bhumi Pujajan on June 5, the four-dimensional process | चौपदरीकरणाचे ५ जूनला भूमिपूजन

चौपदरीकरणाचे ५ जूनला भूमिपूजन

Next



कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन करण्यास केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी मंजुरी दिली आहे. तर सिंधुदुर्ग विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन कणकवली येथे ५ जून रोजी होणार आहे. हे भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष, माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
येथील भाजप संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण, महिला आघाडी तालुकाध्यक्षा गीतांजली कामत उपस्थित होत्या.
प्रमोद जठार म्हणाले, मुंबई -गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर असून त्याचे उद्घाटन ५ जून रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच दिवशी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन कणकवलीत करण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी निसर्गरम्य अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्था’ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. आयुर्वेद शिक्षणासाठी तसेच अनुसंघनासाठी व जनसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देता येण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
या आयुर्वेद संस्थेसाठी ५० एकर जागेची गरज आहे. या जागेची निश्चिती करून परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व आपण याबाबत पाठपुरावा करीत असल्याचे जठार यांनी यावेळी सांगितले. जठार म्हणाले, दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे एमआयडीसीसाठी ७०० एकर जागा घेण्यात आली आहे. त्यापैकी १०० एकर जागा या आयुर्वेद संस्थेसाठी द्यावी अशी मागणी भाजपच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच दोडामार्ग परिसरात औषधी वनस्पती लागवडीसाठी पूरक वातावरण आहे.
मुंबई- गोवा महामार्गही जवळच आहे. त्यामुळे ही जागा सुचविण्यात आली आहे. भाजप पक्षाच्यावतीने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे आमचे लक्ष आहे. स्वत:ची मालमत्ता वाढविण्यापेक्षा जनतेसाठी सार्वजनिक मालमत्ता तसेच मुलभुत सोयी सुविधा निर्माण करण्याच्यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी
सांगितले. (प्रतिनिधी)
राणेंची नौका वादळात भरकटली
नारायण राणेंची नौका कधी शिवसेनेच्या किनाऱ्याला तर कधी भाजपच्या किनाऱ्याला लागत असते. ही नौका वादळात भरकटली आहे. नागपूर, दिल्ली असा प्रवास ही नौका करीत आहे. ही नौका आणखीन कुठे वळते ते आता पहायचे आहे. राजकारण हा संयमाचा खेळ आहे. राजकारणात जास्त काळ टिकायचे असेल तर संयम आवश्यक आहे. राणेंचा पक्ष प्रवेशापेक्षा हेतू वेगळा आहे. त्यांचे व्यक्तिमत्व पहाता पक्ष प्रवेशासाठी ते एवढे उतावीळ होतील असे वाटत नाही. भाजप हा पक्ष कुठल्याही न्यायालयीन गोष्टीत हस्तक्षेप करीत नाही. तसेच कुणाचेही अहित चिंतीत नाही. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार हे निश्चितच आहे. यामागे राणेंची राजकीय कोंडी करण्याचा उद्देश नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप पक्ष सक्षम आहे. त्यामुळे पक्षात कोणाला घ्यायचे अथवा नाही हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. ताकद द्यायचीच असेल तर जिल्हा भाजपल द्या, असे आम्ही पक्ष श्रेष्ठींना सांगितले आहे. असे नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाविषयी प्रमोद जठार म्हणाले.

Web Title: Bhumi Pujajan on June 5, the four-dimensional process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.