कॅन्सर रुग्णालय सावंतवाडी, कोलगाववासीयांसाठी भूषण
By admin | Published: January 3, 2016 11:51 PM2016-01-03T23:51:54+5:302016-01-04T00:40:14+5:30
बबन साळगावकर : आॅल्विन बरेटो यांच्या हस्ते ‘ईश प्रेमालय’ रुग्णालयाचा प्रारंभ
सावंतवाडी : ख्रिश्चन समाज नेहमीच समाजसेवेसाठी अग्रेसर राहिला आहे. सावंतवाडीसारख्या ठिकाणी कॅन्सर रूग्णालय उभे राहते, हे आमच्यासाठी व कोलगाववासीयांसाठी खरोखरच भूषण आहे. या रूग्णालयाला आमच्याकडून जेवढी होईल तेवढी मदत दिली जाईल, असे मत सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडले. ते कोलगाव येथे सिस्टर आॅफ द क्रॉस चावनोड प्रोव्हिनस आॅफ पुणे या संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘ईश प्रेमालय’ या कॅन्सर रूग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, धर्मप्रांताचे बिशप आॅल्विन डिसोझा, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, कोलगाव सरपंच दीपाली काजरेकर, उपसरपंच फ्रान्सिस डिसोझा, जिल्हा परिषद सदस्या वृंदा सारंग, पोलीस निरीक्षक रणजित देसाई, सिस्टर ईमली जेकॉब, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम, नगरसेविका अनारोजीन लोबो आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सावंतवाडी व कोलगावच्या सीमेवर कॅन्सरसारखे रूग्णालय उभे राहत आहे. कॅथॉलिक समाज हा नेहमीच समाजसेवेसाठी अग्रेसर असतो. त्यांचे समाजकार्य मी जवळून बघितले असून, त्यांची मला नेहमीच मदत असते. सर्वसामान्य माणसाला आधार वाटावा, असे हे रूग्णालय असणार असून, या रूग्णालयासाठी जेवढी काय लागेल ती मदत आम्ही करणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.
कोलगाव सरपंच दीपाली काजरेकर यांनी सांगितले की, कोलगावसारख्या छोट्याशा गावात हे रूग्णालय उभे राहिले आहे. येथील रूग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. हे रूग्णालय सिंधुदुर्गसाठी खरोखरच आदर्श असे रूग्णालय असावे. येथील सर्वसामान्य रूग्णांची सेवा होईल, याची आम्हाला खात्री असून, या रूग्णालयाला कोलगाववासीय नेहमीच आपले सहकार्य देतील, असे सांगितले. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी युवकांनी व्यसनापासून अलिप्त राहावे, जेणेकरून त्यांना कर्करोगासारखे आजार होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. जरी कॅन्सरसारखे रूग्णालय आपल्या येथे उभे राहत असले, तरी आपण रूग्ण म्हणून त्यात भरती न होता इतरांच्या सेवेसाठी आपण तत्पर राहिले पाहिजे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
सिस्टर ईमली जेकॉब यांनी उद्घाटन कार्यक्रमात रूग्णालयाविषयी माहिती दिली. हे रूग्णालय ४० लाख रूपये खर्च करून उभारण्यात आले असून, जिल्ह्यातील हे पहिलेच कॅन्सर रूग्णालय आहे. कॅन्सर तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात असलेल्या रूग्णांवर उपचार करून त्यांचे अखेरचे आयुष्य वेदनाविरहीत आणि समाधानकारकरित्या व्यतीत होण्यासाठी हे रूग्णालय उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे बिशप आॅल्विन बरेटो यांनी यावेळी ख्रिश्चन धर्मातील बांधवांना प्रार्थना दिली. तसेच रूग्णालयाचे फित कापून उद्घाटन केले. यावेळी जिल्ह्यातील ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रूग्णालयाच्या कामात सहकार्य करणाऱ्या तत्कालीन सरपंच राजेश हळदणकर, सरपंच दीपाली काजरेकर, फ्रान्सिस डिसोझा यांचे यावेळी कौतुक करण्यात
आले. (प्रतिनिधी)