सांगिर्डेवाडीतील भूषण राणे स्थानबद्ध

By admin | Published: December 20, 2015 12:40 AM2015-12-20T00:40:44+5:302015-12-20T00:40:44+5:30

अट्टल गुंड : कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

Bhushan Rane of Sangidewadi detained | सांगिर्डेवाडीतील भूषण राणे स्थानबद्ध

सांगिर्डेवाडीतील भूषण राणे स्थानबद्ध

Next

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीपासून प्रथमच कुडाळ तालुक्यातील सांगिर्डेवाडी येथील अट्टल गुंड भूषण विजय राणे (वय २५) याला सातत्याने सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणल्याप्रकरणी स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केली.
आरोपी भूषण राणे याच्यावर दंगा करणे, प्राणघातक हल्ला करणे व टोळी जमवून दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे रत्नागिरी येथील विशेष कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे सांगून शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व व्हिडिओ पायरसी प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत १९८१ मध्ये हा अधिनियम बनविण्यात आला. त्यामध्ये १९९६ व २००९ मध्ये सुधारणाही करण्यात आल्या. या कायद्यांतर्गत कारवाई करताना त्या व्यक्तीवर सार्वजनिक सुव्यवस्था बिघडविणे, गुंडागर्दी करणे अशाप्रकारचे दोन गुन्हे ज्याचा निकाल न्यायालयात प्रतीक्षेत आहे व दोन गुन्ह्यांचा निकाल लागला आहे, अशा गुन्हेगाराचा समावेश होतो. अशा गुन्हेगाराचा संबंधित पोलीस ठाण्याकडून अहवाल पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला जातो.
भूषण राणे याच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाणे येथे यापूर्वी एकूण चार गुन्हे नोंद झाले होते. त्यातील दोन गुन्ह्यांतून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. अद्याप त्याच्यावर दोन गुन्ह्यांची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न, टोळी जमवून दहशत निर्माण करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे, तर नुकताच कुडाळ बसस्थानकाजवळील मंजुनाथ शेट्टी या चहाच्या टपरीवाल्याला दमदाटी व बेदम मारहाण केल्याचा गुन्हाही दाखल आहे. या सर्व प्रकरणांचा आढावा घेता त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी पोलीस अधीक्षकांकडे केला होता. त्यानुसार तो जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता व त्यावर शुक्रवारी सायंकाळी निर्णय घेण्यात आला.
या कायद्यातील तरतुदीनुसार भूषण राणे याला एक वर्षाच्या स्थानबद्धतेसाठी रत्नागिरी कारागृहात पाठविण्यात आले आहे. तसेच त्यानंतरही पुन्हा त्याची प्रवृत्ती तशीच राहिल्यास दुसऱ्या वेळीही स्थानबद्धतेचा प्रस्ताव देण्याची तरतूद या कायद्यात आहे. या स्थानबद्धतेमुळे दंगे करणे, प्राणघातक हल्ला करणे, दहशत माजविणे, वातावरण बिघडविणे अशा कृती करणाऱ्या प्रवृत्तींना निश्चितच वचक बसणार आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Bhushan Rane of Sangidewadi detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.