ओसरगाव येथील टोलनाका सुरू करण्यामागे मोठे आर्थिक गणित, संदेश पारकरांचा गंभीर आरोप
By सुधीर राणे | Published: June 1, 2023 11:57 AM2023-06-01T11:57:14+5:302023-06-01T11:57:43+5:30
सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळावी यासाठी तीव्र संघर्ष करणार
कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथील टोल नाका लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. एम.एच.०७ च्या गाड्यांना टोलमाफी द्या किंवा ओसरगाव येथील टोलनाका जिल्ह्याबाहेर हलवा अशी जनतेची मागणी असून त्यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करु. असे सांगतानाच हा टोल नाका सुरू करण्यामागे मोठे आर्थिक गणित आहे. असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला आहे.
कणकवली येथील विजयभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पारकर म्हणाले, ओसरगाव येथे १ जूनपासून टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. टोल वसुलीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने ७ ते ७.५ लाख रुपये सरकारला प्रत्येक दिवशी भरायचे असून दिवसाची वसूली ११ ते ११.५० लाख होणार असल्याचा अंदाज आहे. जे सध्या सत्तेत आहेत, त्यांना दीड लाख द्यायचे व ठेकेदाराला ३ लाख मिळतील असे हे टोल वसुलीमागे आर्थिक गणित आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. यासाठी जिल्हावासीयांनी सहकार्य केले. पण अनेकांना अजून जमिनीचा व त्यांच्या मालमत्तेचा मोबदला मिळालेला नाही. कणकवलीमध्ये आरओडब्ल्यू लाईन नुसार काम झालेले नाही. ड्रेनेज सिस्टीम अपूर्ण आहे. पुलावरून धबधब्याप्रमाणे पाणी कोसळते, सर्व्हिस रोड अरुंद आहेत. यासमस्यांबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मात्र, तरीही टोल वसूलीसाठी प्रयत्न केला जात आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही टोलवसुलीला विरोध करत आहोत. एमएच ०७ च्या गाडयांना माफी मिळायला हवी, ही आमची मागणी आहे.
ओसरगांव टोलमुळे जिल्हयाचे विभाजन होत आहे. न्यायालय, प्रशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय ,वैद्यकीय महाविद्यालय आदीसाठी चार तालुक्यांतील लोकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
टोलमुक्त सिंधुदुर्ग समितीच्या माध्यमातूनही जिल्हावासीयांचा यासाठी प्रयत्न सुरू आहे. या लढ्यासाठी जिल्ह्यातील जनतेचेही सहकार्य हवे आहे. जनतेने टोल भरण्यास विरोध केला तरच हे आंदोलन यशस्वी होणार आहे, असेही संदेश पारकर म्हणाले.
टोलबाबत सर्वपक्षीयांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी पातळीवर बैठक होऊन निर्णय घेण्याची गरज होती. मात्र, सर्वजण गप्प आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून आमचा लढा सुरू असणार आहे. याच प्रश्नांच्या अनुषंगाने आपण बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली व त्यांचे या प्रश्नांकडे लक्षही वेधल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.