ठाकरे सरकारच्या काळात कोकणचे मोठे नुकसान!, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप
By सुधीर राणे | Published: November 26, 2022 07:09 PM2022-11-26T19:09:28+5:302022-11-26T19:10:05+5:30
'फ्रेंड ऑफ बीजेपी' असे अभियान राबविण्यात येणार
कणकवली : सगळ्यात निष्क्रिय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या रूपाने राज्याने गेल्या अडीच वर्षात पाहिला. भाजपाशी बेईमानी करत त्यांनी सरकार बनवले आणि ते जनतेचा अपेक्षा भंग करणारे ठरले. ठाकरे सरकारच्या काळातच कोकणचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकार ते नुकसान निश्चित भरून काढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जानवली येथील हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड येथे आज, शनिवारी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यात सर्वात मोठे यश केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळेल. ३२५ ग्रामपंचायतीपैकी ७५ टक्केहून अधिक ग्रामपंचायती भाजप जिंकेल. 'महिला वांरीयर्स' बनविण्याचे काम आम्ही करणार आहोत. वर्षभरात जिल्ह्यात सात लाखांहून अधिक लोकांपर्यंत वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून आम्ही पोहचू असे नियोजन केले आहे.
आतापर्यंत राज्यातील ३२ जिल्ह्यात माझा दौरा पूर्ण झाला आहे. विकासात्मक आणि संघटनात्मक असा हा दौरा आहे. भाजपा संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. सिंधुदुर्गात ५०० प्रवाशी कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. सर्वसामान्य तसेच गरीबांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत, लाभार्थ्यां पर्यंत पोहचविण्यासाठी ते काम करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. त्यांना संपर्क करून आम्ही भाजपशी जोडणार आहोत. 'फ्रेंड ऑफ बीजेपी' असे अभियान राबविण्यात येणार आहे. मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भाजपची सत्ता असलेले सरकार आणू, अशी शपथही कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यापुढील काळात प्रचंड ताकदीने भाजप वाढेल. असेही ते म्हणाले.