कोकणात होणार महाकाय पेट्रो प्रकल्प

By Admin | Published: July 3, 2016 11:34 PM2016-07-03T23:34:59+5:302016-07-03T23:34:59+5:30

दोन लाख कोटी खर्च : १५ हजार एकर जमीन लागणार

The Big Petro Project will be organized in Konkan | कोकणात होणार महाकाय पेट्रो प्रकल्प

कोकणात होणार महाकाय पेट्रो प्रकल्प

googlenewsNext

मुंबई: ‘नवरत्नां’मध्ये गणल्या जाणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या मिळून देशातील सर्वांत मोठा तेल शु्द्धिकरण प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असून त्यासाठी नेमके ठिकाण अद्याप ठरले नसले तरी कोकणात दोन-तीन ठिकाणी त्यासाठी शोध सुरु आहे.
इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सर्वांत मोठ्या सरकारी तेल कंपन्या व ‘इंजिनियर्स इंडिया लि.’ ही आघाडीची सरकारी अभियांत्रिकी कंपनी मिळून हा महाकाय प्रकल्प उभारणार आहेत. खनिज तेलाचे शुद्धिकरण आणि अन्य अनुषंगिक पेट्रोजन्य पदार्थांचे उत्पादन असा मिळून हा एकत्रित प्रकल्प असेल. इंडियन आॅईलचे संचालक (रिफायनरीज) संजीव सिंग यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ही माहिती दिली. या प्करल्पासाठी १२ ते १५ हजार एकर जागा लागेल व त्यादृष्टीने महाराष्ट्रात पश्चिम किनाऱ्यावर (म्हणजेच कोकणात) दोन ठिकाणांचा शोध घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
देशातील आजवरच्या सर्वात मोठया अशा या पेट्रोकेमिकल प्रकल्पाची वार्षिक क्षमता ६० दशलक्ष टन असेल व त्याच्या उभारणीसाठी सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्च येण्याची अपेक्षा आहे, असेही सिंग म्हणाले.
हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्याची योजना आहे. पहिला टप्पा सुमारे १.२ ते १.५ लाख कोटी रुपये खर्चाचा असेल. त्यात वार्षिक प्रत्येकी २० दशलक्ष टन क्षेमतेच्या दोन तेल शुद्धिकरण संयंत्रांखेरीज सुगंधी रसायने, नॅप्था क्रॅकर व पॉलिमर उत्पादनांची सोय असेल.
जमीन संपादन पूर्ण झाल्यापासून पाचते सहा वर्षांत पहिला टप्पा उभारून पूर्ण होईल. त्यानंतर ५० ते ६० हजार कोटी रुपये खर्चाचा दुसरा टप्पा हाती घेण्यात येईल, असे सिंग म्हणाले.
या पेट्रोकेमिकल प्रकल्पात पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) व विमानाच्या इंधनाखेरीज इतर पेट्रोजन्य पदार्थांचे उत्पादन होईल. येथून महाराष्ट्रातील प्लास्टिक, रसायने व कापड उद्योगांसाठी कच्चा मालही पुरविला जाऊ शकेल. (विशेष प्रतिनिधी)
कोकणातील जागा सोईची
हा प्रकल्प पश्चिम किनारपट्टीवर उभारणे नैसर्गिक लाभाचे ठरेल. कारण आखाती देश, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतून सागरी मार्गाने खनिज तेल येथे आणणे सोईचे ठरेल.
हाच प्रकल्प पूर्व किनारपट्टीवर उभारला तर आयात खनिज तेलाचा वाहतूक खर्च बॅरलमागे एक डॉलरने वाढेल. मागणी असलेल्या देशांतर्गत बाजारपेठेत येथून तयार तेल उत्पादने पाठविणेही सुलभ पडेल.
इंडियन आॅईलचे सध्याचे सर्व तेल शुद्धिकरण कारखाने प्रामुख्याने उत्तर भारतात असल्याने तेथून दक्षिण व पश्चिम भारतात माल पुरविणे अडचणीचे ठरते. त्यामुळे इंडियन आॅईल पश्चिम किनाऱ्यावर नवा कारखाना काढण्याच्या विचारात होतीच. भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम यांचे मुंबईत तेल शुद्धिकरण कारखाने आहेत, परंतु वाढती मागणी पूर्ण करण्यास ते कमी पडतात.

Web Title: The Big Petro Project will be organized in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.