...तर मोठा राजकीय भूकंप घडवेन : राणे
By admin | Published: March 20, 2017 11:09 PM2017-03-20T23:09:33+5:302017-03-20T23:09:33+5:30
...तर मोठा राजकीय भूकंप घडवेन : राणे
कुडाळ : आपण कोणालाही व आपल्याला कोणीही भेटलेले नाही. मला इतर पक्षांत जाण्यात रस नाही. माझ्यासारखा माणूस असले गुपित लपवून ठेवणार नाही. एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांना सोबत घेण्यात येईल. तसेच माझा निर्णय तुम्हा सर्वांना पहिला सांगितला जाईल. पक्ष बदलण्याबाबतचा तसा निर्णय घेण्याची वेळ आल्यास मी छोटेमोठे फटाके फोडणार नाही तर मोठा भूकंपच घडवून आणेन, अशी स्पष्टोक्ती राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी केली.
नारायण राणे हे स्वगृही परतणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे बोलत होते. त्यांनी पक्ष प्रवेशाबाबतच्या सर्व शंका-कुशंकांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. आपले निर्णय हे सर्वसमावेशक असतात आणि आपली भूमिका स्पष्ट असते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कुडाळ येथील हॉटेल कोकोनटमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, रणजित देसाई, विकास कुडाळकर, गुरूनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, कुडाळ नगराध्यक्ष विनायक राणे, संदीप कुडतरकर, आदी उपस्थित होते.
राज्याचा अर्थसंकल्प हा जनतेच्या हिताचा नसून खोटारडा व दिशाभूल करणारा आहे. मागील अर्थसंकल्पातील केवळ २४ हजार कोटी रुपयेच खर्च करणारे भाजप सरकार यावर्षी ७७ हजार कोटी रुपये काय खर्च करणार? असा सवाल करत भाजपा सरकार केवळ मोठा आकडा दाखवून जनतेची दिशाभूल करण्यात माहीर असल्याचे या अर्थसंकल्पातून सिद्ध करत आहे, अशी टीका केली. (प्रतिनिधी)
बळी गेल्यानंतर संशोधन केंद्र उभारणार काय ?
जिल्ह्यात माकडतापाच्या पार्श्वभूमीवर संशोधन केंद्र्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. पण हे संशोधन केंद्र लोकांचा नाहक बळी गेल्यावर उभारणार काय, असा सवाल करून आपण मंत्री असताना खेकडा प्रकल्प व तिलारीचे पाणी किनारपट्टीला पाईप लाईनव्दारे देण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, पालकमंत्री दीपक केसरकर या अर्थसंकल्पात हे प्रकल्प दाखवून श्रेय लाटत आहेत, असा आरोप त्यांनी केला.