विजापूरचा विद्यार्थी दरीत कोसळला
By admin | Published: July 8, 2014 12:33 AM2014-07-08T00:33:59+5:302014-07-08T00:34:23+5:30
चेतना कॉलेजचा विद्यार्थी
आंबोली : विजापूर येथील चेतना कॉलेजच्या विद्यार्थ्याला आंबोलीतील पर्यटन चांगलेच महागात पडले. गेळे येथील कावळेसाद पॉर्इंटवरील रेलिंग पार करताना पाय घसरून पवन कुलकर्णी (वय २१, रा. विजापूर, कर्नाटक) हा विद्यार्थी दरीत कोसळला. ही घटना आज, सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पवनचा शोध घेण्याचे काम सावंतवाडी पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी करीत होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो सापडू शकला नाही.
याबाबत माहिती अशी की, विजापूर येथील चेतना महाविद्यालयाचे बीसीए अभ्यासक्रम शिकणारे सात विद्यार्थी आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारच्या सुमारास त्यांनी कावळेसाद गेळे येथील धबधब्याचा आनंद लुटला. याच वेळी कावळेसाद येथील सिंमेटच्या बंधाऱ्यावरून पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी पवन कुलकर्णी हा या रेलिंगला धरत बंधाऱ्यावरून जात होता.
पवन सोबत असलेले रामचंद्र पाटील, सदाशिव मुळवाड, प्रवीण गुरकुले, अविनाश बिरादार, अनंत कोरी, मुर्गेश आळगुदगी या त्याच्या मित्रांनी त्याला जाण्यास मज्जाव केला. मात्र, पवन ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने मित्रांच्या विरोधानंतरही रेलिंगला पकडून बंधाऱ्यावर चालण्यास सुरुवात केली. पाय घसरल्याने पवनचा रेलिंगचा हात सुटला व पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे तो खाली कोसळला. यावेळी मित्रांनी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्नही केला; पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि तो सुमारे १८०० ते २००० फूट खोल दरीत कोसळला.
मित्रांनी त्याची शोधाशोध केली, परंतु मुसळधार पाऊस व दाट धुके यामुळे तो दरीत दिसेनासा झाला.
या घटनेची माहिती विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर लगेच तिथे पोलीसपाटील दशरथ कदम दाखल झाले आणि आंबोली पोलिसांना याबाबत माहिती दिली. तत्काळ आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच सावतंवाडी पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांना याबाबत माहिती दिली. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. तेथील परिस्थितीवर तहसीलदार सतीश कदम हे लक्ष ठेवून असून, युवकाची शोधाशोध उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, धुके व पावसामुळे शोधकार्यात बाधा येत होती.
पवन कुलकर्णी हा बीसीएचे शिक्षण घेत असूून, त्याची आई शिक्षिका, तर वडील कर्नाटकात एसटी महामंडळात वाहक आहेत. घटनेची माहिती पवनच्या आई-वडिलांना देण्यात आली आहे. ते आंबोलीकडे येण्यास निघाले आहेत. (वार्ताहर)