जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: बांदा येथे मराठा समाजाची दुचाकी रॅली
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 7, 2023 06:53 PM2023-09-07T18:53:03+5:302023-09-07T18:55:07+5:30
बांदा ( सिंधुदुर्ग ) : जालना जिल्ह्यातील सकल मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी बांदा येथे ...
बांदा (सिंधुदुर्ग) : जालना जिल्ह्यातील सकल मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी बांदा येथे सकल मराठा बंधू-भगिनींनी दुचाकी रॅली काढली. यामध्ये मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते.
सकाळी अकरा वाजता बांदेश्वर मंदिर येथून ही बाईक रॅली निघाली. शहरातील मोर्येवाडा, तेली तिठा, उभा बाजार, गांधी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्टँडमार्गे गडगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील सरोटे गावात मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील व मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष राजाराम ऊर्फ बाळू सावंत यांनी केला. संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. आम्ही गावागावांतून या घटनेचा निषेध करत आहोत. मराठा समाजाची किंमत आणि हिंमत आम्ही मराठ्यांवर लाठीहल्ला करून रक्त सांडणाऱ्यांना दाखवून देऊ, असे बाळू सावंत यावेळी म्हणाले.
यावेळी म. गो. सावंत म्हणाले, राज्यकर्त्यांनी त्वरित निर्णय घेऊन व विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षणासाठी ठराव संमत करावा. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा शासन निर्णय त्वरित काढून, मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी केली.
या दुचाकी रॅलीमध्ये राजाराम ऊर्फ बाळू सावंत, माजी अध्यक्ष नीलेश मोरजकर, ज्ञानेश्वर सावंत, गुरू सावंत, स्वप्निल सावंत, विराज परब, साई सावंत, मिलिंद सावंत, जयवंत राणे, विहान राणे, परिमल सावंत, सागर सावंत, मकरंद तोरस्कर, राकेश परब, मयूर चराटकर, दीपक सावंत यांच्यासह वाफोली, डिंगणे, शेर्ले, इन्सुली व परिसरातील बहुसंख्य मराठा बांधव सहभागी झाले होते.