आंबोली येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
By अनंत खं.जाधव | Published: June 26, 2024 10:45 PM2024-06-26T22:45:16+5:302024-06-26T22:45:38+5:30
आजरा येथील युवक
सावंतवाडी: आंबोली- नांगरतासवाडी येथील इसावा वळणावर मोटरसायकल दगडावर आदळून झालेल्या अपघातात आदित्य भिकाजी कोरवी ( १९, रा- आजरा, जि. कोल्हापूर) या दुचाकीस्वाराचा जागीच ठार झाला आहे.
हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नांगरतास वळणावर झाला. आदित्य त्याचे मित्र ओंकार( कार्तिक) कारेकर( १९ रा. रवळनाथ कॉलनी, वेदांत कोंडूरसर (१६रा. सुहाळे आजरा) हे आणि इतर मित्र दुपारी आजरा येथून कावळेसाद पॉइंट येथे आले होते. कावळेसाद पॉइंट पाहून झाल्यानंतर तिघेजण आणि त्यांचे सहकारी मित्र पुन्हा आजरा येथे जाण्यास निघाले असता वाटेत नांगरतास इसावा येथील वळणावर त्याना रस्त्याचा अंदाज आला नाही आणि दुचाकीसह रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन पडले यात मोटर सायकलस्वार आदित्य याचे डोके दगडावर आदळून जास्त रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मृत पावला.
तर पाठीमागे बसलेल्या ओंकार कारेकर आणि वेदांत कोंडूसकर यांना किरकोळ दुखापत झाली. अपघाता नंतर पाठीमागे बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी तो जिवंत आहे ते पाहीले परंतु त्याची काहीच हालचाल नसल्याने ते घाबरून बाजुला पळून गेले. त्यानंतर आंबोली पोलीसांनी त्यांना गडदुवाडी स्टॉप येथून शोधून आणले. अपघाताची खबर ओंकार कारेकर यांने आंबोली पोलीसात दिली.
अपघाताची खबर मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार दिपक शिंदे, पोलीस नाईक मनिष शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.अधिक तपास आंबोली पोलीस करीत आहेत.