चिपळुणात उद्यापासून पक्षीवैभव सर्वेक्षण
By admin | Published: June 18, 2015 09:45 PM2015-06-18T21:45:49+5:302015-06-19T00:22:40+5:30
अली पुण्यतिथी : पक्ष्यांची पुस्तिकाही काढणार
चिपळूण : चिपळूणच्या पक्षीमित्रांच्यावतीने चिपळूणमधील पक्ष्यांचे सर्वेक्षण व अभ्यास असा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ २० जून सलीम अली पुण्यतिथीच्या दिवशी होणार असून, लगेचच दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ७ वाजता रामतीर्थ तलाव येथे पक्षी निरीक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
या प्रकल्पात चिपळूणमधील पक्ष्यांचे सर्वेक्षण, अभ्यास करण्यात येणार असून, त्यांची विविध हंगामातील स्थलांतरे इत्यादी बाबी शोधून काढण्यात येणार आहेत. या प्रकल्पामध्ये चिपळूणमधील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, पक्षीमित्र, महिला, गृहिणी, पक्षीतज्ज्ञ यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर वनविभाग, चिपळूण नगरपरिषद व इतर शासकीय विभाग यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची पहिली कार्यशाळा दि. १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सह्याद्री निसर्ग मित्रच्या कार्यालयात घेण्यात आली. पक्षीमित्रांच्या १० टीम करण्यात आल्या असून, चिपळूणच्या १० भागात त्या सर्वेक्षण करणार आहेत. दर पंधरा दिवसांनी संपूर्ण चिपळूणच्या पक्ष्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
तसेच नोव्हेंबरमध्ये सर्वांना सहभागी करुन एक मोठी पक्षी गणना घेण्यात येईल. या संपूर्ण कार्यक्रमातून चिपळूणचे पक्षीवैभव एकत्रितपणे शोधले जाणार आहे. त्याचा उपयोग पर्यटनासाठी करुन घेण्यात येणार आहे. तसेच पक्ष्यांच्या संरक्षण संवर्धानसाठी याचा उपयोग होणार आहे.
या कार्यक्रमाची जबाबदारी सह्याद्री निसर्ग संस्था, चिपळूणने घेतली असून, ऋतुजा खरे यांच्या नेतृत्त्वाखाली हा संपूर्ण अभ्यास होणार आहे. एक वर्षाच्या या प्रकल्पातून चिपळूणच्या पक्ष्यांची एक छोटी पुस्तिका काढण्यात येणार आहे. रविवार, २१ जून रोजी सकाळी ७ वाजता रामतीर्थ तलाव येथे पक्षीमित्रांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सह्याद्रीच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)