भाजप जिल्ह्यात सेनेचा बालेकिल्ला पोखरणार
By admin | Published: June 28, 2015 10:37 PM2015-06-28T22:37:30+5:302015-06-29T00:33:02+5:30
मेहता यांची निवड : संपर्क मंत्रीपदावरून चर्चेला उधाण
रत्नागिरी : गेल्या काही दशकांपासून कोकण विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनून राहिला आहे. या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने काहीशी घुसखोरी करीत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपला कोकणात आपला वेगळा ठसा उमटवणे वा कार्यकर्त्यांची मोट बांधणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे नव्या दमाने कोकणात भाजपचे बळ वाढवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाजपचे संपर्क मंत्री म्हणून प्रकाश मेहता यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात राज्य सरकारमधील पर्यावरणमंत्री म्हणून रामदास कदम हे काम पाहात आहेत, तर खेडमधून रवींद्र वायकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हे दोन्ही मंत्री शिवसेनेचेच आहेत. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडे तीन, तर राष्ट्रवादीकडे दोन मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपला मात्र रत्नागिरी जिल्ह्यात तसेच शेजारच्या सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात एकाही ठिकाणी विधानसभा मतदारसंघ जिंकता आला नाही. युतीच्याच माध्यमातून यापूर्वीचा कारभार सुरु होता. परंतु आता राज्य स्तरावरच शिवसेना - भाजपचा काडीमोड झाल्यामुळे प्रत्येक पक्षाला स्वतंत्रपणे आपले अस्तित्व निर्माण करण्याची वेळ आली आहे. कोकण हा शिवसेनेचा राजकीय बालेकिल्ला असताना राष्ट्रवादीने जोरदार धडक देत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला आव्हान दिले आहे. मात्र, भाजप कोठेही बळकट असल्याचे दिसून येत नाही.
कोकणआणि मुुंबई यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे मुुंबईतील यशासाठी कोकणातील संघटना बळकट असणे अत्यंत आवश्यक मानले जाते.
ही बाब लक्षात घेऊनच भाजपने गेल्या काही महिन्यांपासून कोकणात पक्ष संघटना मजबुतीचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी देशभरातील सभासद मोहीमही कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आली. परंतु या मोहिमेला म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही. ही बाब लक्षात घेऊनच राज्याच्या भाजप नेतृत्त्वाने कोकणातील संघटनेला बळकटी आणण्यासाठी काही नवीन प्रयोग करण्याचे ठरविले आहे.
कोकणात भाजपचा स्वतंत्र मंत्री देण्यापेक्षा अन्य विभागात जे भाजपचे मंत्री म्हणून काम करतात, त्यांनाच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्रीपद देऊन पक्षसंघटना मजबूत करता येईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटते आहे. त्यातूनच संपर्क मंत्रीपदाचा विषय पुढे आला आहे. तरीही कोकणातीलच एखाद्या भाजप नेत्याला मंत्रीपद द्यावे, अशी कोकणमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यादृष्टीने भाजपचे प्रदेश प्रवक्ते सुरेंद्र तथा बाळ माने तसेच माजी आमदार विनय नातू यांच्याकडे मंत्रीपद दिले जावे, अशी येथील भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यातून अनेक विकासकामांना गती मिळून अन्य पक्षांना शह देणे सोपे जाईल. तसेच पक्ष संघटनाही मजबूत बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संपर्क मंत्रीपदाचा पर्याय स्वीकारला जाणार की, कोकणातील नेत्याला मंत्रीपद दिले जाणार, याबाबत तर्क वितर्क सुरु आहेत. (प्रर्तििनधी)
कोकणात मजबूत संघटन करणार
कोकणात भाजपचे वर्चस्व निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आता कोकणकडे आपला मोर्चा वळविला आहे. संपर्क मंत्रीपद महत्त्वाचे असून, प्रकाश मेहता यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. संपूर्ण कोकणात जिल्ह्यात राज्य सरकारमधील महत्त्वाचे पद देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत.