विद्यमान आमदार म्हणून भाजप उमेदवारी देत नाही, राजन तेलींचा नितेश राणेंना अप्रत्यक्ष टोला
By अनंत खं.जाधव | Published: March 14, 2023 03:59 PM2023-03-14T15:59:14+5:302023-03-14T16:04:38+5:30
देशातील अनेक विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी नाकारली
सावंतवाडी : विधानसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय केंद्रीय पातळीवर होत असतो. देशातील अनेक विद्यमान आमदारांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. भाजप पक्ष ज्यांना समजतो ते जाहीर वक्तव्य करणार नाहीत असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला. तर मंत्री दीपक केसरकर यांना भाजपवर बोलण्याचा अधिकार नाही. ते शिंदे गटात गेले त्यावेळी त्यांच्या सोबत कोण गेले हे शोधावे लागतील अशी टिकाही केसरकरांवर केली.
सावंतवाडीतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रविंद्र मडगावकर, माजी नगरसेवक उदय नाईक, सुधीर आडीवरेकर, परिमल नाईक, आनंद नेवगी, महेश धुरी, हळदणकर, बाळू शिरसाट आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तेली यांनी मंत्री केसरकर यांच्यावर सडकून टीका केली. मला विधान परिषद देणारे तुम्ही कोण उलट येथील जनतेने नाकारले तर मलाच तुमची शिफारस करावी लागेल. तुम्ही फक्त घोषणा करता मागील काळात मल्टिस्पेशालिटी रूग्णालय तसेच काथ्या उद्योग, चष्मा कारखाना, सेटटॉप बॉक्स या सर्वाचे काय झाले, किती रोजगार आणले. फक्त विकासाच्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात काही करायचे नाही. आणि आम्ही काय करत असेल त्यात आडकाठी करायचे हे किती दिवस चालणार असा सवाल ही तेली यांनी केला.
तुम्ही विकास केला रोजगार आणला असे म्हणता मग शिवसेनेतून शिंदे गटात गेला त्यावेळी तुमच्या सोबत कोण आले ते जाहीर करा. अन्यथा आम्हाला नाइलाजास्तव तोड उघडावे लागेल आणि तुमचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावा लागेल असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. रोज उठून खोटे बोलायचे जनतेची फसवणूक करायची हे आम्हाला जमत नाही. गेल्या पंचवीस वर्षांत सावंतवाडीतील जनतेशी समरस होऊन काम करतो तुमच्या सारखे मला विमानाला जायचे म्हणून नेहमी लोकांची दिशाभूल करत नाही अशी टीका ही केली.
तर, आमदार नितेश राणे यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला. जे विद्यमान आमदार म्हणतात निवडणूक पूर्वी निवडून आणण्याचे सांगत आहेत हे भाजप पक्षात चालत नाही. देशात अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उमेदवारी आयत्यावेळी रद्द केल्या आहेत त्यामुळे सिटिग उमेदवार वैगरे भाजपत चालत नाही असा सल्लाही यावेळी दिला.
केसरकर यांची जंत्री काढण्याचे काम सुरू
जिथे जायचे त्याचे गोडवे गायचे आणि इतराना शिव्या द्यायच्या हाच कार्यक्रम मंत्री दीपक केसरकर यांचा असून मागील आठ वर्षात कोणाला कशा प्रकारे शिव्या घातल्या यांची जंत्री काढून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे देण्यात येणार आहे असे तेली यांनी सांगितले.