भाजपची रविवारपासून ‘मच्छिमार संवाद यात्रा’
By admin | Published: May 11, 2016 11:17 PM2016-05-11T23:17:46+5:302016-05-11T23:53:42+5:30
रविकिरण तोरसकर : मच्छिमार गावांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणार
मालवण : मच्छिमार व मच्छिमार गावांना भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्नाचा अभ्यास करून त्याचा कृती आराखडा शासन दरबारी मांडणे व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना शोधणे. सागरी पर्यटनाच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील मच्छिमार युवक-युवतींना रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध करून देणे तसेच दुर्लक्षित पर्यटन स्थळे जगासमोर आणणे या हेतूने भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेलच्या वतीने १५ मे ते १५ जून या कालावधीत 'मच्छिमार संवाद यात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या मच्छिमार गावांमध्ये भाजपाच्या मच्छिमार सेलचे पदाधिकारी मच्छिमारांशी संवाद साधणार आहेत. आरोंदा ते विजयदुर्ग या भागातील सर्व मच्छिमार गावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नीलक्रांती’ संकल्पनेच्या पायाभरणीसाठी यात्रा मच्छिमारांना महत्वाची व फायदेशीर ठरणार आहे, अशी माहिती भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार संयोजक रविकिरण तोरसकर यांनी दिली.
मच्छिमार संवाद यात्रेत स्थानिक स्वराज्य संस्था, मच्छिमार सहकारी सोसायटी, प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवी संस्था, बचतगट, मच्छिविक्रेते, प्रशासकीय अधिकारी, मच्छिमारी सहकारी संस्था तसेच शैक्षणिक संस्था यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. मच्छिमार व मच्छिमार गावांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत.
मच्छिमारांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना, रोजगार विषयक माहिती, मेळाव्याचे नियोजन, महिला बचतगट सक्षमीकरण, मुद्र्रा योजना, मच्छिमार युवकांसाठी व्यावसायिक व शैक्षणिक कर्ज आदी योजनाची माहितीही देण्यात येणार असल्याचे तोरसकर यांनी म्हटले
आहे. (प्रतिनिधी)
आरोंदा टू विजयदुर्ग
जिल्ह्यातील आरोंदा ते विजयदुर्ग या ३९ मच्छिमारी गावांमध्ये एक गाव, एक दिवस अशी संवाद यात्रा असणार आहे.
भाजप मच्छिमार सेल तसेच राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी व मासेमारीचे काम करणाऱ्या समाजसेवी संस्थाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन तोरसकर यांनी केले आहे.