भाजप मित्रपक्ष; आमची लढाई काँग्रेसविरोधातच
By Admin | Published: July 3, 2016 11:10 PM2016-07-03T23:10:42+5:302016-07-03T23:10:42+5:30
वैभव नाईक : हळवल येथील मेळाव्यात प्रतिपादन ; शिवसेना गावागावात पोहोचविणार
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याशी शिवसेनेची नाळ स्थापनेपासून जुळलेली आहे. सिंधुुदुर्गातील अनेक शिवसैनिक स्थापनेपासून कार्यरत होते़. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खासकरून सिंधुदुर्गवर प्रेम होते़. सिंधुदुर्गात पुन्हा नव्या जोमाने शिवसेना कणखरपणे उभी रहात आहे़. आमदार, खासदार निवडून आल्यानंतर शिवसेना गावात पोहोचविण्याची जबाबदारी आमची आहे़ भाजप आपला मित्रपक्ष असल्याने आपली लढाई त्यांच्या सोबत नाही़ तर काँग्रेस विरोधातच असल्याचा निर्वाळा आमदार वैभव नाईक यांनी दिला़.
शिवबंधन पंधरवड्याच्या निमित्ताने कळसुली विभागीय मेळाव्याचे आयोजन हळवल येथे शुक्रवारी करण्यात आले होते़. यावेळी आमदार वैभव नाईक बोलत होत़े. यावेळी एस. टी़ कामगार संघटना जिल्हाध्यक्ष संजय पडते, सिध्दीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कणकवली शहरप्रमुख शेखर राणे, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, नगरसेवक सुशांत नाईक, सरपंच शर्वरी राणे, उपतालुकाप्रमुख राजू राणे, राजू राठोड, अनिल शेट्ये, भास्कर राणे, उपसरपंच निलेश ठाकूर, विभागप्रमुख नितीन हरमलकर, युवा सेना विभागप्रमुख रोहित राणे, सुदर्शन राणे, गणेश राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते़
आमदार नाईक म्हणाले, कणकवली विधानसभेवर पुढचा आमदार शिवसेनेचाच गेलेला असेल़ त्यासाठी आतापासून जिल्हापरिषद व पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी तयार रहा. ज्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी शिवसेना, ज्या ठिकाणी सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी शिवसेना हा विचार घेऊन प्रत्येक शिवसैनिकाने काम केले पाहिजे़. राज्यात स्वबळावर लढून देखील ६३ आमदार निवडून आले़. शिवसेना हा सर्वसामान्याचा पक्ष आहे़. त्यामुळे तुमच्यामधील सामान्य कार्यकर्ता आमदार बनू शकला़. आंदोलन करत असताना हळवल, शिरवल, ओसरगाव येथील कार्यकर्ते घेऊनच शिवसेनेची आंदोलन यशस्वी केली. कणकवली मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असला पाहिजे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा. येत्या काळात जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराविरोधता ठिकठिकाणी आवाज उठवला पाहिजे. अनेक ठिकाणी कोट्यवधींचा निधी देऊन सुध्दा मोठ्या प्रमाणात ठेकेदारांनी लूट केली आहे़ मंत्री युती सरकारचे आहेत. त्यांनी सिंधुदुर्गातील वीजप्रश्नांसाठी ८३ कोटी मंजूर केले आहेत़ हळवल उड्डानपूलप्रश्नी एक महिन्यात मार्ग मोकळा न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल़ येथील दशक्रोशीतील जनतेला न्याय मिळवून दिला जाईल.
कार्यक्रमात सिध्दीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, अनिल शेट्ये, राजू शेटये, संजय पडते यांनी मार्गदर्शन केले़ सूत्रसंचालन राजू राणे यांनी केले. (वार्ताहर)