वैभववाडी नगरपंचायतीत भाजपला ‘लॉटरी’
By admin | Published: October 9, 2015 11:29 PM2015-10-09T23:29:18+5:302015-10-09T23:29:18+5:30
प्रभाग क्रमांक सात बिनविरोध : काँग्रेस उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला लॉटरी लागली आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील काँग्रेसच्या उमेदवार मयुरी नाना तांबे यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचकाची स्वाक्षरी नसल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी अवैध ठरविले. त्यामुळे भाजपच्या सुप्रिया राजन तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ७ हा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रभागातून महायुतीतर्फे भाजपच्या सुप्रिया तांबे व काँग्रेसतर्फे मयुरी तांबे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली होती. शुक्रवारी छाननीच्यावेळी काँग्रेसच्या मयुरी तांबे यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचकाची स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट करीत निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविले. त्यामुळे काँग्रेसने नामनिर्देशनपत्रावर सूचकाची स्वाक्षरी घेण्याची विनंती भिसे यांच्याकडे केली. मात्र, काँग्रेसची विनंती त्यांनी धुडकावून लावली.
नगरपंचायतीच्या सर्व प्रभागातील नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी भिसे यांनी निवडणूक निरीक्षक रवींद्र सावळकर यांच्या उपस्थितीत अवैध ठरविलेल्या नामनिर्देशनपत्रावर सुनावणी घेतली. त्यावेळी काँग्रेसतर्फे अॅड. अनिल निरवडेकर यांनी बाजू मांडताना सुप्रिया तांबे याआधी ग्रामपंचायत सदस्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
त्यामुळे पडताळणी समितीकडील पावती ग्राह्य न धरता त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली. त्यावेळी भाजपतर्फे अॅड. उमेश सावंत यांनी बाजू मांडली. त्यानंतर भिसे यांनी काँग्रेसचा युक्तिवाद धुडकावून आधीचा निर्णय कायम ठेवताना मयुरी तांबे यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले. (प्रतिनिधी)