भाजप-शिवसेनेला समान जागा, अपक्षाच्या हाती ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 01:46 PM2021-01-18T13:46:17+5:302021-01-18T13:47:11+5:30
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्रामपंचायतीची सत्ता आता अपक्ष उमेदवार ठरवणार आहे. ही ग्रामपंचायत शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती.
सिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्रामपंचायतीचा निकाल मजेशीर लागला आहे. शिवसेना आणि भाजपाने येथील लढत अटीतटीची केली होती. मात्र, आता अपक्ष उमेदवाराच्या हातात ग्रामपंचायतीच्या सत्तेची चावी आली आहे. कारण, भाजपा आणि शिवसेनेला समान जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे, अपक्ष उमेदवार कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार यावर येथील ग्रामपंचायतीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्रामपंचायतीची सत्ता आता अपक्ष उमेदवार ठरवणार आहे. ही ग्रामपंचायत शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्यात दोन्ही पक्षांना 5-5 अशा समान जागा मिळाल्या आहेत. स्वागत नाटेकर हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत ते मूळचे भाजपचे असल्याने नाटेकर कोणाला साथ देतात यावर तेथील सत्ता ठरणार आहे. त्यामुळे, आता नाटेकरांच्या स्वागताला भाजपा आणि शिवसेना पायघड्या टाकणार असेच दिसून येते. ना. मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटातील पटकथेप्रमाणे येथील ग्रामपंचायाची सत्ता अपक्षाच्या हाती गेली आहे. त्यामुळे, जिल्ह्यात या ग्रामपंचायतीच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, इन्सूलीत पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांचे पती महेश धुरी यांचा शिवसेनेकडून पराभव करण्यात आला आहे.
विजयी उमेदवार शिवसेना - कृष्णा सावंत, पूजा पेडणेकर, काका चराटकर, सोनाली मेस्त्री, आरती परब.
भाजप- नमिता नाईक, सखाराम खडपकर, तात्या वेंगुर्लेकर, राधिका देसाई, वर्षा सावंत.
अपक्ष - स्वागत नाटेकर.