सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचाच बोलबाला! ३२५ पैकी तब्बल १८० ग्रामपंचायतीत कमळ फुलले
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 20, 2022 06:40 PM2022-12-20T18:40:13+5:302022-12-20T18:43:25+5:30
आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवलीमध्ये ५८ पैकी तब्बल ४०, वैभववाडीत १७ पैकी १३ आणि देवगडमध्ये ३८ पैकी २२ ग्रामपंचायतींत यश मिळवून मोठा करिष्मा केला आहे.
सिंधुदुर्ग - जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तब्बल १८० ग्रामपंचायतींवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही नारायण राणे आणि पर्यायाने भाजपचा करिष्मा पहायाला मिळाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने ७२ जागा मिळवत व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. भाजप, शिवसेनेपाठोपाठ ग्रामविकास पॅनलने ५० जागा मिळवत मोठी झेप घेतली आहे. नव्याने उदययास आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या साथीने १५ ग्रामपंचायती विजय मिळविला आहे. राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या असून काँग्रेसला मात्र भोपळाही फोडता आलेला नाही.
या निवडणुकीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी आमदार नितेश राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मतदार संघात मोठी आघाडी घेतली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी कुडाळ, मालवण या आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघात मालवणात ३० आणि कुडाळमध्ये २८ ग्रामपंचायती पटकावून मोठे यश मिळविले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.
मोठ्या, प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायती भाजपाकडे
कणकवली तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कलमठ, वागदे, फोंडाघाट, नांदगाव, कळसुली, तळेरे, कासार्डे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा, केसरी, माजगाव. देवगड तालुक्यातील किंजवडे, कोटकामते, विजयदुर्ग, वाघोटन. मालवण तालुक्यातील धामापूर, गोठणे, वडाचापाट, हिवाळे, असगणी, मालोंड अशा मोठ्या ग्रामपंचायतींवर भाजपचे कमठ फुलले आहे.
नितेश राणेंचा करिष्मा
भाजपाचे कणकवली मतदार संघातील आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवलीमध्ये ५८ पैकी तब्बल ४०, वैभववाडीत १७ पैकी १३ आणि देवगडमध्ये ३८ पैकी २२ ग्रामपंचायतींत यश मिळवून मोठा करिष्मा केला आहे.
मंत्री दीपक केसरकरांना भाजपाची साथ
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदार संघातील दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडीत भाजपाच्या साथीने चांगले यश मिळविले असले तरी त्यांच्या मतदार संघातील अनेक गावात ठाकरे शिवसेनेनेही आघाडी घेतली आहे.
वैभव नाईक यांना धक्का
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना मालवण तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. मालवण तालुक्यात भाजपाने मोठी बाजी मारली आहे. मालवण तालुक्यात ५५ पैकी ३० ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. तर कुडाळ तालुक्यातही भाजपाने चांगले यश मिळवित ५४ पैकी २८ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.
एकुण ग्रामपंचायती ३२५
पक्षनिहाय
भाजपा : १८०
ठाकरे सेना : ७२
ग्रामविकास : ५०
शिंदे सेना : १५
अपक्ष : ४
राष्ट्रवादी : २
रिक्त : २
काँग्रेस : ०