नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका!, संतोष कानडे यांचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 07:26 PM2022-01-06T19:26:50+5:302022-01-06T19:27:12+5:30
राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे.
कणकवली : शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर टीका केली आहे. सुशांत नाईक जर असे म्हणत असतील कि, राजन तेली हे निवडून येऊ नये असे ईश्वराचे मत होते. तर सतीश सावंत, सुरेश दळवी, अविनाश माणगावकर आदी त्यांच्या पॅनलचे लोक जिल्हा बँकेत निवडून आले नाहीत. हा कशाचा संकेत होता? याचे उत्तर त्यांनी द्यावे. मात्र, नाईकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा सतीश सावंत यांना फटका बसला आहे. हे मात्र सत्य आहे. असा टोला भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी लगावला आहे.
नगरसेवक तथा सिंधुदुर्गं जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुशांत नाईक यांनी बुधवारी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर संतोष कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्हा बँक निकालाच्या घडामोडी घडल्यानंतर नाईक कंपनीने सतीश सावंत यांना आगामी विधानसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून पण बाजूला केले आहे हे दिसून येते.
दुसरे सांगायचे झाले तर, जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सतीश सावंत यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला होता. त्यामुळे सुडाच्या भावनेतून प्रमोद वायंगणकर यांच्या माध्यमातून नाईक कंपनीने सतीश सावंत यांचा घात केला नसेल कशावरून ? त्याचबरोबर ते राजन तेली यांच्या पराभवाचे बोलत असतील तर, आमदार वैभव नाईक यांचे वडील यांना पण ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.
वैभव नाईक, सतीश सावंत , संदेश पारकर हे नेते कितीवेळा पराभवाला सामोरे गेले याचे आत्मपरीक्षण नाईक कंपनीने करावे. आपल्या विजयाची गाथा जनतेला तुम्ही सांगत असाल तर २२ वर्षानंतर आपल्या वडीलांच्या नावे मते मागायची वेळ तुमच्यावर का आली ? त्या सहानुभूतीवर आपण निवडून आलात हे विसरू नका.
तुमच्या वरिष्ठांचा विश्वास जर तुमच्यावर होता तर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी राजन तेली यांच्या घरी का आले ? ते नाईक कंपनीकडे का नाही आले ? त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर टीका करताना नाईक कंपनीने विचार करून बोलावे. तरच त्यांना पुढील दिवस चांगले जातील असेही संतोष कानडे यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.