हे तर आमच्या जीवावर निवडून आलेले भुरटे, आशिष शेलारांची विनायक राऊतांवर सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:50 PM2023-02-06T18:50:42+5:302023-02-06T18:50:42+5:30
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था म्हणजे काप गेला भोका रवली
मालवण : विनायक राऊत आम्हाला बाजार बुणगे बोललेत, परंतु आम्ही त्यांना सांगतो, तुम्ही भुरटे चोर आहात. भुरट्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. विनायक राऊत हे आमच्या जीवावर जिंकून आलेत, प्रचाराला मोदींची सभा आणि फोटो लावलेत, राऊतांची अवस्था म्हणजे मालवणी भाषेत सांगायचे झाले तर, धाक नाय दरारो, फुकटचो नगारो, अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
ते भाजपा आनंद मेळाव्यामध्ये बोलत होते. खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना भाजपाच्या आनंद मेळाव्यावर टीका केली होती. भाजपाचा आनंद मेळावा बाजार बुनग्यांचा मेळावा असे राऊत म्हणाले होते.
शेलार पुढे म्हणाले, भाजपा आनंद निमित्ताने आंगणेवाडी येथे रेकॉर्ड ब्रेक सभा पहावयास मिळत आहे, भारतीय जनता पक्षाच्या कामाचे विराट दर्शन याठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या आमच्या शिलेदारांकडे पाहून होत आहे. आताच समजलं तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था म्हणजे काप गेला भोका रवली. आत्ताच मगाशी आमदार नितेश राणे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मी त्यांना सांगू इच्छितो की पुढच्या आनंद मेळाव्याला या ठिकाणी अधिकच्या दीडशे खुर्च्या लावा, मुंबई महानगर पालिकेचे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे दीडशे नगर सेवक आणि महापौर सुद्धा इथे आणणार आहोत.
फडणवीस त्याचा बॅकलॉग भरून काढतील- निलेश राणे
निलेश राणे म्हणाले, मालवण तालुका याठिकाणी यजमानी तालुका आहे. आज जवळपास साडेआठ वर्ष झाली, इथे आमचा खासदार, आमदार नाही. या काळात जिल्ह्याला विकास निधी निधी पासून ठाकरे सरकारने वंचित ठेवले. आता या जिल्ह्याचा बॅकलॉग फडणवीसच भरून काढू शकतात. आज आमचा हक्क आहे म्हणून आम्ही विनंती करतो. आपण या जिल्ह्यावर आशीर्वादाचा हात ठेवला तर या जिल्ह्याचा कायापालट होवू शकतो.
पुढच्या मेळाव्यात या ठिकाणी दीडशे दीडशे खुर्च्या लावून मुंबई महानगरपालिकेचे महापौर आणि नगरसेवक मेळाव्याला आणणार असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाचा विकास पर्यटनाने कृषी उद्योगाच्या माध्यमातून हाती घेणार असल्याचे सांगितले.