भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 06:29 PM2022-10-22T18:29:54+5:302022-10-22T18:30:53+5:30

नाईक व जाधव आणीबाणीच्या गोष्टी करतात आणि देशात आणीबाणी लावणाऱ्या त्या काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसतात

BJP leader MLA Pravin Darekar criticizes Shiv Sena leader Bhaskar Jadhav | भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

googlenewsNext

कुडाळ : भास्करचा आता सूर्योदय नाही तर सूर्यास्त जवळ आला आहे. तर वैभव नाईक यांचे वैभव जाऊन भाजपचे वैभव कुडाळ विधानसभेमध्ये निश्चितपणे उदयास येईल, असा विश्वास भाजपाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कुडाळ येथील संविधान बचाव रॅलीच्या सभेदरम्यान व्यक्त केला.  

भाजपाची संविधान समर्थन रॅली शुक्रवारी भाजपा कार्यालय कुडाळ ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी काढण्यात आली. या रॅलीला मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजपा प्रदेश चिटणीस माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा उपाध्यक्ष रणजित देसाई, तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, संजू परब, राजू राऊळ, विशाल परब, आनंद शिरवलकर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगितले, नाईक व जाधव आणीबाणीच्या गोष्टी करतात आणि देशात आणीबाणी लावणाऱ्या त्या काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसतात.

या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व जनतेने मान्य केले आहे. तर कोकणच्या जनतेने मंत्री नारायण राणेंचे नेतृत्व मानले आहे. त्यामुळे आमच्या नेतृत्वावर वेडं-वाकडं बोलाल तर तुम्हाला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी जाधव यांना दिला.
आम्ही संविधान घेऊन चालतो. डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला कायद्याचं पालन करायला शिकवलं. त्यामुळे संविधानाचा अपमान, लोकशाहीला तुडविणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. ज्याला ठोकायचा असेल तर ठोकू, असा इशारा दरेकर यांनी दिला.

ताकद दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही : राणे

यावेळी माजी खा. नीलेश राणे म्हणाले की, कुडाळमध्ये चार दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी अघोषित मोर्चा काढला. खरंतर चौकशी लावली म्हणून यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी कुडाळात मोर्चा काढण्यात आला. हे उद्धव ठाकरे सरकार नाही, हे शिंदे-फडणवीस यांचे कायद्याचे सरकार आहे. चिपळूणच्या  जाधव यांना एक दिवस तरी आपली ताकद दाखवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.

बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही : प्रसाद लाड

यावेळी प्रसाद लाड म्हणाले, भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांचे आयटम गर्ल आहेत. तर वैभव नाईक हे चिंधीचोर आहेत, उदय सामंत यांच्या पाया पडणारे जाधव यांनी आम्हाला शिकवू नये. आमचे नेते राणे यांना जेवणावरून उठविणाऱ्या उद्धव ठाकरे व भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही.

Web Title: BJP leader MLA Pravin Darekar criticizes Shiv Sena leader Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.