जिथे वाद नाही तिथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प; नितेश राणेंची शिवसेनेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 09:34 PM2022-03-30T21:34:03+5:302022-03-30T21:34:27+5:30
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देवगडात शिवसेनेचा आवाज वाढला असल्याचे वक्तव्य केले होते. पण वाढलेला हा आवाज मांजरीचा की वाघाचा असा टोला त्यांनी आज लगावला.
कणकवली : ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला नाणार गाव वगळता इतर गावातून पाठींबा आहे. त्यामुळे नाणार वगळून लवकरच ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार आहे. शिवसेना पक्षानेही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता खासदार विनायक राऊत हे रिफायनरीचे एकमेव विरोधक उरले आहेत. पण त्यांना त्यांच्या पक्षात काडीची किंमत नाही अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली.
कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला जनतेमधून उत्स्फुर्त पाठींबा आणि समर्थन मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेला या प्रकल्पाला मान्यता देण्याशिवाय आता कोणताही पर्याय राहिलेला नाही. तसेच कुठलाही प्रकल्प आला की त्याला विरोध करायचा आणि जनतेची माथी भडकवायची. तसेच काही दिवसांनी त्या प्रकल्पाला समर्थन द्यायचे .असे काम शिवसेनेची मंडळी करत आहेत.
बारसू या भागात रिफायनरी प्रकल्प होणार आहे. शिवसेनेने तेथील जागेला पाठींबा दिला असून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे त्या गावातील जमिनीच्या सातबारावर कुणाची नावे आहेत हे पहावे लागेल. तसेच ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार,पण कुठल्या जागेत होणार हे केंद्र सरकार ठरवणार आहे. यासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दिल्लीत इतर मंत्र्यांची भेट घेणार आहोत.असे नितेश राणे यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देवगडात शिवसेनेचा आवाज वाढला असल्याचे वक्तव्य केले होते. पण वाढलेला हा आवाज मांजरीचा की वाघाचा असा टोला त्यांनी आज लगावला. तसेच नुसते दौरे करून काहीही उपयोग नाही, तुम्ही जिल्हावासीयांसाठी किती निधी आणला. पर्यटन व्यावसायिकांसाठी काय पॅकेज तयार केले याची माहिती त्यांनी द्यायला हवी. काहींनी ओरिजनल टायगर म्हणून देवगड मध्ये बॅनर्स लावले. शिवसेना कुठे जिंकली? त्यांच्याकडून जिल्हा बँक गेली. कुडाळ, देवगड या दोन ठिकाणी दुसऱ्या लोकांच्या पाठींबा घेऊन नगरपंचायतीत सत्ता आहे. मला बाहेर ठेवून विरोधकांना जिंकणे शक्य आहे. मात्र, हिम्मत असेल तर मी निवडणुकीच्या रणांगणात असताना त्यांनी विजय मिळवावा. देवगडची सत्ता बदलणे माझ्यासाठी सोपे आहे.माझ्या संपर्कात तेथील अनेक लोक आहेत.त्यामुळे पुढील काळात पाहू कसे करता येईल ते ,असा इशाराही शिवसेनेला आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिला.