वैभव नाईक यांची मालमत्ता १० वर्षात ३०० पट वाढली; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप
By सुधीर राणे | Published: October 18, 2022 05:56 PM2022-10-18T17:56:39+5:302022-10-18T18:24:54+5:30
उद्धव ठाकरेंचे रक्त थंड आहे. त्यामुळेच त्यांना आईस्क्रीम कोन ही निशाणी निवडणूक आयोगाने दिली आहे.
कणकवली : उद्धव ठाकरेंच्या भटक्या कुत्र्यांनी कुडाळ येथील मोर्चाच्यावेळी आमच्यावर भुंकण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांसारखा थेट हल्ला करण्याचे धाडस उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही, त्यामुळे त्यांना भटके कुत्रे व सोंगाडे लागतात अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच २००९ ते २०१९ या दहा वर्षांच्या कालावधीत आमदार वैभव नाईक यांची मालमत्ता तीनशे पट वाढल्याचे लाच प्रतिबंधक विभागाच्या निदर्शनास आल्यानेच त्यांनी चौकशीची नोटीस काढली असल्याचेही ते म्हणाले. कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नीतेश राणे म्हणाले, आईस्क्रीम कोनचा आणि आदित्य ठाकरेंचा काय संबंध आहे हे दिनो मारिओला विचारा. तो सर्व माहिती देईल. उद्धव ठाकरेंचे रक्त थंड आहे. त्यामुळेच त्यांना आईस्क्रीम कोन ही निशाणी निवडणूक आयोगाने दिली आहे. भास्कर जाधव हे स्वतःला शिक्षकाचा मुलगा म्हणवतात. पण त्यांच्यात शिक्षकाच्या मुलासारखे गुण दिसत नाहीत अशी टीकाही जाधव यांच्यावर केली.
हे खपवून घेतले जाणार नाही
आमदार वैभव नाईक संपत्ती गोळा करणार आणि दुसरीकडे त्यांना समर्थन देणारी भटकी कुत्री येथे येऊन राणेंवर गरळ ओकणार हे खपवून घेतले जाणार नाही. नाईक यांनी जनतेसमोर जाऊन आपण स्वच्छ प्रतिमेचे असल्याचे जाहीर करणे गरजेचे होते. मात्र, मोर्चा काढून राणे आणि भाजपावर तोंडसुख घेतले. नाईक यांची तक्रार करणारा प्रदीप भालेकर हा खासदार विनायक राऊत यांचा माणूस होता. भालेकरला तक्रार द्यायला खासदार राऊत यांनीच भाग पाडले असेल. या माझ्या मुद्द्यावर विरोधक का बोलले नाहीत? असा सवालही नितेश राणेंनी केला.
वैभव नाईकांनी एसीबीला उत्तर द्यावे
नितेश राणे यांनी वैभव नाईक यांनी निवडणुकीच्यावेळी आयोगाकडे सादर केलेले प्रतिज्ञापत्र सादर केले. नाईक यांची २००९ साली मालमत्ता १ कोटीची होती. २०१४ साली ती ८ कोटींवर पोचली. २०१९ मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार नाईक यांनी आपली मालमत्ता २५ कोटींची असल्याचे नमूद केले आहे. या अधिकृत मालमत्ता आहेत तर बेनामी मालमत्ता १४० ते १५० कोटींची असल्याचा दावा नितेश राणेंनी केला. या वाढलेल्या संपत्तीविषयी वैभव नाईक आणि चिपळूणवरून भाड्याने आणलेल्या भटक्या कुत्र्यांनी एसीबीला उत्तर द्यावे.
..तर चौकशीला सामोरे जावेच लागेल
वैभव नाईक यांच्या नातेवाईकांच्या व मित्रांच्या नावाने सिंधुदुर्ग, अलिबाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, पुणे येथे शेतजमीन, बिनशेती मालमत्ता कोट्यावधींची आहे. त्याव्यतिरिक्त मुंबई, पुणे, रायगड, अलिबाग, मुरुड येथे फ्लॅट आहेत. त्याशिवाय व्यवसायिक मालमत्ताही आहे. हे कुडाळमधील मोर्चात उन्हातान्हात सहभागी झालेल्या सामान्य शिवसैनिकांनी जाणून घेतले पाहिजे. बेनामी मालमत्ता जर कोणी बनविली असेल तर त्याला चौकशीला सामोरे जावेच लागेल.
भास्कर जाधवांबाबत केला गौप्यस्फोट
पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करणारे भास्कर जाधव हे शिंदे सरकार मध्ये येण्यासाठी किती खटाटोप करीत होते, हे आम्हाला माहिती आहे असा गौप्यस्फोटही नितेश राणेंनी यावेळी केला. ज्या राणेंवर भास्कर जाधव टीका करतात ते जाधव स्वतःच्या मुलाला केवळ जिल्हा परिषदेमध्येच पाठवू शकले आहेत. पण राणेंनी आपल्या एका मुलाला खासदार बनवले. दुसऱ्या मुलाला दोनवेळा आमदार केले. राणे स्वतः मुख्यमंत्री झाले, मंत्री होते, आता केंद्रात मंत्री आहेत. भास्कर जाधव फक्त नगरविकास राज्यमंत्री होऊ शकले याचा आधी त्यांनी विचार करावा.