..अखेर भाजप-मनसेचे सुत जुळले, कुडाळात युतीचा नवा पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 04:41 PM2022-01-12T16:41:36+5:302022-01-12T16:42:08+5:30
कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपला तीन जागांवर मनसेने जाहीर पाठिंबा दिला
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपला तीन जागांवर मनसेने जाहीर पाठिंबा दिला असून, प्रभाग क्र. १६ एमआयडीसी येथे मनसेचे उमेदवार सहदेव पावसकर यांना भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. या स्थानिक पातळीवरील युतीची घोषणा जिल्हा परिषद भाजप गटनेते रणजित देसाई व मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी कुडाळ भाजप कार्यालयात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, भाजप शहराध्यक्ष राकेश कांदे, आनंद शिरवलकर, प्रशांत राणे, मनसे पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे, दीपक गावडे, उमेदवार सहदेव पावसकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रणजित देसाई यांनी सांगितले की, प्रभाग १६ मधील भाजप उमेदवार सुधीर चव्हाण यांच्या निधनानंतर या ठिकाणी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्यात निवडणूक घ्यावी असे सांगितले. त्यामुळे आता या ठिकाणी शिवसेना व मनसे या पक्षाचे उमेदवार आहेत. भाजपचा उमेदवार नाही.
त्यामुळे या प्रभागातील मनसेचे उमेदवार सहदेव पावसकर यांना भाजप जाहीर पांठिबा देत असून त्यांच्या प्रचारात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय राहतील. तसेच इतर तीन भाजप उमेदवारांच्या प्रचारात मनसे सक्रिय राहणार आहे.
युतीला नक्की यश मिळेल : देसाई
यापूर्वी पिंगुळी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे, स्वाभिमान युती करीत सत्ता आणली होती. तसेच पिंगुळी येथील पोटनिवडणुकीत ही मनसेची साथ भाजपला मिळाली व त्यावेळी आमचा विजय झाला होता. त्यामुळे या स्थानिक पातळीवरील भाजप, मनसे युतीला नक्कीच यश मिळणार व चारही उमेदवार आमचे विजयी होतील असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
निकालानंतर मनसे भाजपाच्या गटात : प्रसाद गावडे
यावेळी प्रसाद गावडे यांनी सांगितले की, मनसेचे उमेदवार पावसकर यांना भाजपाने जाहीर पाठिंबा दिला असल्याने भाजप ,मनसे युतीचे नवीन समीकरण युती निर्माण झाली आहे. मनसेही भाजपा उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप जो गट स्थापन करणार त्यात मनसे बांधील राहील असेही त्यांनी सांगितले.