“उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही, स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी खर्चाने उभारला”: राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 03:40 PM2024-08-28T15:40:46+5:302024-08-28T15:41:17+5:30
BJP MP Narayan Rane Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी जो पैसा कमवला, तो हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कमावला. मुख्यमंत्री असताना एकतरी पुतळा उभारला का, अशी विचारणा नारायण राणेंनी केली.
BJP MP Narayan Rane Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत काय केले. शरद पवार निवृत्तीनंतर काय करत आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रात मंत्री होते, तेव्हा मराठा आरक्षण देऊ शकले नाही. आता राजकारण करत आहेत. उद्धव ठाकरेंनी केलेली टीका मी मानत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत. शिवसेना राड्यामुळे ओळखली जाऊ लागली. शिवसेना उदयास कशी आली हे आदित्य ठाकरेंना माहिती नाही. तेव्हा तो शेंबडा होता. उद्धव ठाकरेंनाही काय माहिती शिवसेना काय होती, सुरुवातीला कुठे होते ते, असे प्रत्युत्तर नारायण राणे यांनी दिले.
मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गटातील अनेक नेत्यांसह जयंत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्याचवेळी नारायण राणे तेथे पोहोचले. यावेळी ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत महायुतीवर टीका केली. या टीकेला नारायण राणे यांनी चोख शब्दांत उत्तर दिले. ते सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही, स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी खर्चाने उभारला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर, घटनेवर आरोप करण्याशिवाय या लोकांनी कोणतेही विधायक कार्य केलेले नाही. मुंबईत केलेली टीका माझ्या कानावर आली. हे लोक शिवद्रोही असल्याचे काहीतरी ते म्हणाले. उद्धव ठाकरेंकडून चांगल्या भाषेची अपेक्षा नाही. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व हे उदरनिर्वाहाचे साधन बनवले. जो पैसा कमवला, तो हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कमावला. एकतरी पुतळा उभारला का, स्वतःच्या वडिलांचा पुतळा भारत सरकारच्या खर्चाने बनवला. म्हणून उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही. त्यांना चांगले बोलता येत नाही. शिव्या घालणे या पलीकडे दुसरे काही कळत नाही. त्यामुळे ही त्यांनी जी टीका केली आहे, ती या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जनता ओळखते, असा पलटवार नारायण राणे यांनी केला.
दरम्यान, या जिल्ह्याचा कायापालट भाजपाने केला आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगारनिर्मिती स्तरावर जो विकास झाला, तो अन्य कुणी केला नाही. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. एकतरी फॅक्टरी आणली का, पन्नास जणांना कामाला लावले का, एकतरी पूल बांधला का, एकतरी धरणे बांधले का, काही केले नाही, त्या अडीच वर्षांत काही केले नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.